मणिपूर महिला अत्याचार प्रकरणी आरोपींना फाशी द्या; बीडमध्ये आक्रोश आंदोलनात मागणी
By शिरीष शिंदे | Published: July 24, 2023 06:59 PM2023-07-24T18:59:37+5:302023-07-24T19:00:05+5:30
महिलांना निर्वस्त्र करुन त्यांची धिंड काढणाऱ्यांना फाशी द्या अशी मागणी बीड येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.
बीड: मणिपुर राज्यात कुकी समुदायाच्या महिलांना निर्वस्त्र करुन त्यांची धिंड काढणाऱ्यांना फाशी द्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटा न्यायालयातून हटविण्याचे परिपत्रक मद्रास कोर्टाने मागे घ्यावे या मागण्यांसाठी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी सामाजिक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आक्रोश आंदोलन केले.
मणिपूर मधिल कांगपोकपी जिल्ह्यात बी-फिनोम गावात जमावाने तोडफोड करत, लुटमार करत कुकी समुदायाची घरे जाळत लोकांची हत्या करण्यात आली. तसेच दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढण्यात आली. या राष्ट्रीय मानहानीकारक घटनेवर देशभरातुन संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी दखल घेत मणिपुर सरकारने तातडीने कारवाई करावी अन्यथा आम्ही कारवाई करू म्हणत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महिलांना निर्वस्त्र करुन त्यांची धिंड काढणाऱ्यांना फाशी द्या अशी मागणी बीड येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. तसेच मद्रास उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार-जनरल यांनी तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमधील सर्व न्यायालयांना जारी केले आहे. न्यायालयाच्या खोलीत फक्त महात्मा गांधी आणि तमिळ संत तिरुवल्लुवर यांची छायाचित्रे ठेवावीत आणि डॉ. बी.आर.आंबेडकर व इतर नेत्यांची छायाचित्र हटवावीत असे आदेशीत केले आहे. हे परित्रक मागे घ्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.
या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, रामनाथ खोड, शेख युनुस, दत्ता बारगजे, संध्या बारगजे, शेख शफीक, अशोक येडे, रामधन जमाले, सादेक सय्यद, ॲड. गणेश मस्के, नितीन सोनावणे, प्रा. इलियास इनामदार, संगमेश्वर आंधळकर, ॲड. राजेश शिंदे, रामहरी मोरे, ॲड. करुणा टाकसाळ, ॲड. मनिषा कुपेकर, अतुल बडवे, किष्किंधा पांचाळ, अनिता गायकवाड, शेरजमा खान, भीमराव कुटे, बलभीम उबाळे, शेख मुश्ताक, वशिष्ट साबळे, भिमराव पांचाळ, तांदळे सुदाम, नितीन गायकवाड आदी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मागणीचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांच्यासह इतर मंत्र्यांना देण्यात आले आहे.