४१ वर्षांत १५ वेळा भरले मांजरा धरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:38 AM2021-09-23T04:38:02+5:302021-09-23T04:38:02+5:30

अविनाश मुडेगावकर लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : बीड-लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतील १७२ गावांची तहान भागविणारे मांजरा धरण ...

Manjara dam filled 15 times in 41 years | ४१ वर्षांत १५ वेळा भरले मांजरा धरण

४१ वर्षांत १५ वेळा भरले मांजरा धरण

googlenewsNext

अविनाश मुडेगावकर

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : बीड-लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतील १७२ गावांची तहान भागविणारे मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे ग्रामीण व शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटला आहे. धरणाच्या उभारणीपासून गेल्या ४१ वर्षांत धरण १५ वेळा भरले आहे.

मांजरा धरणाची उभारणी १९८० मध्ये झाली. धरणाची क्षमता २२८ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. गेल्या ४१ वर्षांत आजपर्यंत १५ वेळा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे, तर धरणाच्या माध्यमातून बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील १८ हजार २२३ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येते. मात्र, आता गावोगावचा पाणीपुरवठा या धरणावरच अवलंबून असल्याने सिंचनापेक्षा पाणीपुरवठा योजनाच धरणाचा मोठा उपसा करीत आहेत.

धरणाच्या परिसरात परतीचा पाऊस समाधानकारक झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. मांजरा धरणाच्या वरच्या बाजूस नदीच्या उगमस्थानापासून १४ बंधारे आणि लहान-मोठे २६ तलाव निर्माण करण्यात आले आहेत. तरीही यंदा धरण भरले आहे. मांजरा धरणाची संपूर्ण पाणी साठवण क्षमता २२४.०८३ दशलक्ष घनमीटर आहे. त्यामुळे मोठे शेतकरी व नेत्यांची पाणी शेतात ओढण्याची स्पर्धाच लागली आहे. बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील १७२ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या या धरणाची सुरक्षा राखण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. सध्या मांजरा धरण शंभर टक्के भरल्याने धरणाचे सहा दरवाजे उघडून नदीपात्रात व धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.

...

वर्षभरातच संपला धरणातील ८० टक्के पाणीसाठा

मांजरा धरण गेल्या वर्षीही पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र, पाणीपुरवठा योजना व सिंचनासाठी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे धरण ८० टक्के रिकामे झाले. पावसाने ओढ दिली असती, तर अंबाजोगाई, केज, धारूर, लातूर, कळंबसह इतर गावांमध्ये पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाला असता. मात्र, पाऊस जोरदार झाल्याने पाणी प्रश्न मार्गी लागला आहे.

शहराला आठ दिवसांआड पाणीपुरवठा

अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात मुबलक पाणी साठा असला तरी शहराला आठ दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. शहरातील पाणी वितरण व्यवस्था सक्षम नाही. त्यामुळे चार दिवसांआड किंवा सहा दिवसांआड पाणीपुरवठा होऊ शकत नाही. मागे एकदा चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न नगरपालिकेने केला; परंतु तो यशस्वी झाला नाही. वितरण व्यवस्था सक्षम नसल्याच्या कारणामुळे मुबलक पाणीसाठा असूनही अंबाजोगाईकरांना आठ दिवसांचे पाणी साठवून ठेवावे लागत आहे. परिणामी डासोत्पत्ती होऊन डेंग्यू आजाराचे रुग्ण वाढले आहेत.

....

Web Title: Manjara dam filled 15 times in 41 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.