मांजरा धरण पूर्ण भरले, सहा दरवाजे उघडून नदीपात्रात ५ हजार २४१ क्युसेक विसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 12:26 PM2024-09-27T12:26:21+5:302024-09-27T12:27:26+5:30
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे
- मधुकर सिरसट
केज ( बीड): धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने मोठ्या प्रमाणात आवक वाढून लातूर, धाराशिव आणि बीड या तीन जिल्ह्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेले मांजरा धरण शंभर टक्के भरले आहे. संततधार पाऊस आणि आवक लक्षात घेता शुक्रवारी (दि.२७ ) पहाटे धरणाचे एकूण सहा वक्रदरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे मांजरा नदी पात्रात ५ हजार २४१ क्युसेक (१४८. ४४) इतका विसर्ग सूरू असल्याची माहिती धरणाचे शाखाधिकारी सूरज निकम यांनी दिली.
तीन जिल्ह्यांची जीवनवाहिनी
धाराशीव जिल्हातील कळंबच्या दाभा व केज तालुक्यातील धनेगावच्या सिवेवर १९८० साली मांजरा नदीवर मांजरा प्रकल्पाची बांधणी झाली. यानंतर या प्रकल्पात प्रथमतः १९८०-८१ हंगामात पाणीसाठा झाला. तो ९७ दलघमी इतका होता. यानंतर पुढील ४४ वर्षाच्या काळात हा प्रकल्प धाराशीव जिल्हातील कळंब, बीड जिल्ह्य़ातील केज, अंबाजोगाई व लातूर जिल्ह्य़ातील लातूर व रेणापूर तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला वरदान ठरत आला. याशिवाय लातूर शहर, लातूर औद्योगिक वसाहत, कळंब, केज, अंबाजोगाई, धारूर, मुरूड अशा शहरासह शेकडो गावातील पाण्याचा प्रश्न भागवणारा प्रकल्प म्हणून याकडे पाहिले जाते.
सतराव्यांदा झाला ओव्हरफ्लो...
२०२०, २०२१ आणि २०२२ अशा सलग तीन वर्ष धरण भरले होते. त्यानंतर गतवर्षी २०२३ ला पाऊस कमी झाल्याने धरणात केवळ २९ टक्के पाणीसाठा होता. आता २०२४ ला एक वर्षाच्या खंडानंतर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. २३ व २४ सप्टेंबर रोजी पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला. यामुळे ८५ टक्क्यावरचा पाणीसाठा ९५ टक्क्यांवर पोहचत प्रकल्पाची झोळी बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास भरली गेली. ४४ वर्षांच्या इतिहासात पूर्ण क्षमतेने भरण्याची ही सतरावी वेळ आहे.
नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे
जलाशयातून तब्बल ५ हजार २४१ क्युसेक विसर्ग करण्यात आल्याने मांजरा नदीला पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
- राकेश गिड्डे, तहसीलदार, केज
जलपुजनासाठी स्पर्धा...
मांजरा धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग मांजरा नदीत होताच जलपुजनासाठी राजकीय पुढारी आणि कार्यकर्ते यांच्यात स्पर्धा सुरू झाली. दरम्यान, राहुल खोडसे यांनी गुरूवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान पंचक्रोशीतील शेतकरी एकत्र करून जलपुजन केले. तर आ. नमीता मुंदडा, भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, सुनील गलांडे पाटील, तालुकाध्यक्ष भगवान केदार, दिलीप भिसे, रहिमभाई शेख व तालुक्यातील कार्यकर्त्यांनी साडेदहा वाजता जलपूजन केले. जलपुजनाच्या नावाखाली तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.