मन्मथ माऊली, गुरुराज माऊलींचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:03 AM2019-02-11T00:03:33+5:302019-02-11T00:04:29+5:30
तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलधार येथील संजीवन समाधी स्थळी माघ शुध्द पंचमी रविवारी दुपारी १२ वाजता शिवनामाच्या जयघोषात श्रीसंत शिरोमणी मन्मथस्वामींचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा झाला.
बीड : तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलधार येथील संजीवन समाधी स्थळी माघ शुध्द पंचमी रविवारी दुपारी १२ वाजता शिवनामाच्या जयघोषात श्रीसंत शिरोमणी मन्मथस्वामींचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा झाला. कडाक्याच्या थंडीची तमा न बाळगता राज्यभरातून भाविक श्रीक्षेत्र कपिलधार येथे दाखल झाले होते. नेत्रदीपक असा जन्मोत्सव सोहळा हजारो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.
जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त ३ फेब्रुवारीपासून शिवनाम सप्ताहास प्रारंभ झाला. दररोज परमरहस्य पारायण, कीर्तन, शिवपाठ व अन्नदान करण्यात आले. शनिवारी माजलगावकर महाराजांची धर्मसभा झाली.
रविवारी सकाळपासूनच जन्मोत्सवाची लगबग सुरू होती. भाविकांनी मंदिर परिसरातील पंचकुंडात स्नान केल्यानंतर कुंडातील पाण्याने मन्मथस्वामींच्या संजीवन समाधीस अभिषेक घातला. दुपारी बारा वाजता पाळणा हलवून शिवनाम व मन्मथ माऊलींचा गजर करण्यात आला. मन्मथ माऊली, गुरुराज माऊलीच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.
माजलगावकर महाराज, देशीकेंद्र चंद्रशेखर स्वामी महाराज, विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर, शिवाचार्य गंगाधर महाराज वसमतकर, सिध्दलिंग शिवाचार्य महाराज शिंगणापूरकर यांच्या उपस्थितीत जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात पार पडला. मंदिर परिसर तसेच लगतच्या परिसरात भाविकांनी शिस्तीमध्ये महाप्रसादाचा लाभ घेतला.
चांदीच्या पाळण्यात चांदीची मूर्ती
जन्मोत्सवाला मन्मथस्वामींची चांदीची मूर्ती चांदीच्या पाळण्यात ठेवली होती तसेच मंदिरातील संजिवन समाधीवर चांदीचा मुखवटा चढवून गाभारा फुले व फुग्यांनी सुशोभित केला होता.
३८ वर्षांपासून जन्मोत्सव
जन्मोत्सवानिमित्त मागील आठ दिवसांपासून बीड, माजलगाव, नांदेड, लातूर, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यांतून भाविक येथे दाखल होत होते. प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज माजलगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ३८ वर्षांपासून मन्मथस्वामी महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. पंधरा दिवसांपासून जन्मोत्सवाची तयारी सुरू होती.