बीडमध्ये उद्या मनोज जरांगेंची निर्णायक इशारा सभा; शहरातील शाळा-महाविद्यालय बंद राहणार
By सोमनाथ खताळ | Published: December 22, 2023 07:41 PM2023-12-22T19:41:35+5:302023-12-22T19:42:47+5:30
रॅली संपून मनोज जरांगे पाटील हे दुपारी दोनच्या सुमारास पाटील मैदानावर सभास्थळी पोहचतील.
बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची शनिवारी बीडमध्ये निर्णायक इशारा सभा होत आहे. या सभेसाठी लाखो लोक येणार आहेत. यामुळे बीड शहरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गैरसाेय होऊ नये, यासाठी बीड शहरातील सर्व शाळा बंद ठेवल्या जाणार आहेत. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी याबाबत सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक यांना पत्र काढले आहे.
दरम्यान, शनिवारी सकाळी बीड शहरातील रॅली संपून मनोज जरांगे पाटील हे दुपारी दोनच्या सुमारास पाटील मैदानावर सभास्थळी पोहचतील. यावेळी त्यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. समन्वयकांनी परवानगीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. त्यांनी पोलिस अधीक्षकांकडे तो पाठविला. यावर पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी या पुष्पवृष्टीसाठी परवानगी दिल्याचे लोकमतला सांगितले.