'आजवर अनेकांची वाट लावली...'; पोलीस ठाण्याच्या आवारातच डीवायएसपींकडून हवालदाराला शिवीगाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 08:48 PM2022-04-18T20:48:13+5:302022-04-18T20:49:14+5:30
पोलीस अधीक्षकांकडे हवालदाराने केली तक्रार
माजलगाव (बीड) : पोलीस ठाण्याच्या आवारात लोकांना का बसू दिले, असे म्हणून येथील ग्रामीण पोलीस ठाण्यातील हवालदाराला पोलीस उपअधीक्षक सुनिल जायभाये यांनी शिवीगाळ केली. हा प्रकार शनिवारी दुपारी घडला. याप्रकरणाची तक्रार हवालदाराने पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
माजलगाव ग्रामीण ठाण्याचे हवालदार एस.एच.राठोड हे शनिवारी दुपारी कर्तव्यावर होते. याचवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी जायभाये हे ग्रामीण पोलीस ठाण्यात आले. त्यांनी राठोड यांना ठाण्याच्या आवारात हे कोण लोक जमा झालेत. तुम्ही त्यांना इथे का थांबू दिले, असे विचारले. राठोड यांनी अपघातातील गाडीच्या चौकशीसाठी तर काही लोक हे फिर्याद घेऊन आल्याचे सांगितले. परंतू जायभाये यांना असमाधानकारक उत्तर वाटल्याने त्यांनी येथील सिमेंट बाकडे तोडण्याचे फर्मान काढले तसेच शिवीगाळही केली. राठोड यांना तर सर्वांसमक्ष आई बहिणीवर शिवीगाळ करत सिमेंटचे बेंच तोड म्हणू लागले. माझा पाय फ्रॅक्चर असल्याचे सांगताच तुझा दुसरा पायही फ्रॅक्चर करून टाकीन. तुला सस्पेंड करील, मी भोकरदनला असताना अनेकांची वाट लावली आता तुझी पण वाट लावतो, असे म्हणत शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. आता जायभाये चांगलीच अडचणीत सापडले असून यात काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.
मी हवालदाराचा मुलगा
शंकर राठोड यांच्याकडे सध्या असलेल्या बीटामध्ये समाधानकारक काम नाही. त्यांचे बीट बदलायच सांगितले होते. त्यामुळेच त्याने हे कारस्थान केले. मी एका पोलीस हवालदाराचा मुलगा आहे, त्यामुळे पोलीसांचा अपमान करने माझ्या स्वभावात नाही.
- सुनिल जायभाये, उपविभागीय पोलीस अधिकारी, माजलगाव