मनोज जरांगेंच्या गावात मराठा-ओबीसी भिडले; डीजे वाजविण्यावरून दगडफेक

By सोमनाथ खताळ | Published: June 27, 2024 10:44 PM2024-06-27T22:44:02+5:302024-06-27T22:44:57+5:30

डीजे वाजविण्यावरून दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली असून, वाहनांचेही नुकसान झाले आहे.

maratha obc clashes in manoj jarange patil village due to dj playing | मनोज जरांगेंच्या गावात मराठा-ओबीसी भिडले; डीजे वाजविण्यावरून दगडफेक

मनोज जरांगेंच्या गावात मराठा-ओबीसी भिडले; डीजे वाजविण्यावरून दगडफेक

सोमनाथ खताळ, शिरूर कासार/गेवराई (जि.बीड) :मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या मातोरी (ता. शिरूरकासार) या गावात मराठा आणि ओबीसी यांच्यात राडा झाला. डीजे वाजविण्यावरून दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केल्याने अनेकांची डोके फुटली असून वाहनांचेही नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी रात्री ८ वाजता घडली. रात्री १०:३० वाजेपर्यंत गावात तणावपूर्ण शांतता होती. पाेलिसांची कुमक गावात पाेहोचली होती. सर्वांना शांतता ठेवण्याचे आवाहन केले जात होते.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे जरी उपोषण केले असले तरी त्यांचे मूळ गाव हे शिरूर तालुक्यातील मातोरी आहे. वडिगोद्री येथे उपोषणास बसलेले प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे गोपीनाथ गडावरून पाडळसिंगीमार्गे भगवानगडावर जाणार होते. त्यांचे स्वागत करण्यासह त्यांना भगवानगडाकडे नेण्यासाठी मातोरी परिसरातील माळेगाव, पारगाव, तिंतरवणी आदी गावांतील ओबीसी बांधव हे डीजे लावून पाडळशिंगीकडे निघालेले होते. मातोरीत आल्यानंतर डीजेवर काही गाणे वाजवले. यावर मातोरी गावातील काही लोकांनी डीजे बंद करा, गाणे वाजवू नका असे सांगितले. हे बोलत असतानाच त्यांच्यात शाब्दिक वाद झाले. त्यानंतर याचे रूपांतर दगडफेकीत झाले. यामध्ये दोन्ही गटांचे लोक जखमी झाले आहेत. तसेच गाणे वाजवलेला डीजे आणि काही दुचाकींचीही तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना समजताच चकलांबा, शिरूर, गेवराई पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मातोरी गावात धाव घेतली. तसेच दंगल नियंत्रण पथक व इतर विशेष पथकेही गावात दाखल झाली होती. बातमी लिहीपर्यंत गावात तणाव होता.

ये-जा करणाऱ्या वाहनांवरही दगडफेक

माताेरी गावापासूनच मातोरी-पाथर्डी-अहमदनगर हा महामार्ग जातो. या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. मराठा, ओबीसी यांच्यात वाद झाल्यानंतर काही लोकांनी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांवरही दगडफेक केली. रात्री ९ वाजेनंतर या मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दोन गटांत वाद झाल्याचे समजताच गावात धाव घेतली. दगडफेकीत काही नुकसान झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. - नारायण एकशिंगे, सहायक पोलिस निरीक्षक, चकलांबा.

सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिसांचा बंदोबस्त देखील आहे. सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे. - देवीदास शिंदे, सरपंच, मातोरी.

Web Title: maratha obc clashes in manoj jarange patil village due to dj playing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.