मराठा, ओबीसी समाजाला न्याय मिळवून देणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:26 AM2021-06-04T04:26:14+5:302021-06-04T04:26:14+5:30
जनतेशी समाजमाध्यमावरून संवाद साधताना पंकजा मुंडे परळी : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांची व्रजमूठ बांधून मराठा आरक्षण व ओबीसी ...
जनतेशी समाजमाध्यमावरून संवाद साधताना पंकजा मुंडे
परळी : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांची व्रजमूठ बांधून मराठा आरक्षण व ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून गावागावांत पोहोेचणार असल्याचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सांगितले. आरक्षणाचा प्रश्न आणि राज्यातील कोरोनाची स्थिती संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचे त्या म्हणाल्या.
लोकनेते मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथगडावर जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर राज्यातील जनतेशी समाजमाध्यमावरून संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
आजचा दिवस आपणा सर्वांसाठी तसा दुःखाचा दिवस आहे. आपल्या लाडक्या लोकनेत्याला आजच्याच दिवशी म्हणजे सात वर्षांपूर्वी आपण गमावले आहे. आज पोस्टल इन्व्हलपच्या माध्यमातून केंद्र सरकारने त्यांचा गौरव करून एक सामाजिक संदेश दिला आहे. प्रत्येकाने हे इन्व्हलप घेऊन पंतप्रधान मोदी यांना आपल्या मागण्या मांडाव्यात, असे त्या म्हणाल्या. लोकं म्हणतात, तुमचा पराभव झाला, पराभव हा माणसाचा अल्पविराम आहे, पूर्णविराम नाही. लोकांच्या मनातील आशा संपून जातील, तो खरा पराभव आहे. आमचा निवडणुकीत पराभव झाला असेल, पण लोकांच्या मनातील आशा अजून मावळल्या नाहीत. याच आशा माझं ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि व्हेंटिलेटर आहेत. आमचं ठरलंच आहे, आम्हाला एकदा शिवाजी पार्क हे मैदान भरवायचे आहे. हे कोणत्या निवडणुकीसाठी नाही तर वंचित आणि बहुजन तरुणांना दाखवलेल्या स्वप्नांसाठी भरवायचे आहे, असं त्या म्हणाल्या.
...तर आज दारोदार फिरण्याची वेळ आली नसती
"गेल्या वर्षभरात मराठा समाजाची घोर निराशा झाली आहे. मराठा समाजाचा प्रत्येक तरुण मला समाजमाध्यमावर संदेश देत आहेत की, गोपीनाथ मुंडेंनी भगवानगडावरून आम्हाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. आज ते असते तर मराठा तरुणाला आरक्षणासाठी असं दारोदार फिरायची वेळ आली नसती," आज बहुजन समाजाचा मोठा प्रश्न आहे. आरक्षणाच्या माध्यमातून सर्वांनी फक्त आपल्या पोळ्या भाजण्याचं काम केलं आहे. ही नवी पिढी आहे. यांना खोटं सांगू नका, खरं सांगा. मराठा समाजाला किती टक्के आरक्षण देता हे सांगा. तुम्ही सोळा टक्के होत नाही म्हणता, मग आम्हाला टक्के सांगा. आम्ही तयार आहोत," असं पंकजा मुंडे यांनी म्हटले.
===Photopath===
030621\03bed_13_03062021_14.jpg
===Caption===
पंकजा मुंडे