बीड जिल्ह्यात मराठा आरक्षण, कर्जबाजारीपणामुळे तरूणाने संपविले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 04:56 PM2018-09-01T16:56:07+5:302018-09-01T16:58:47+5:30
मराठा समाजाला आरक्षण नसल्याने सुशिक्षित असूनही नौकरी लागत नाही. त्यातच नापिकीमुळे बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून २० वर्षीय तरूणाने सात दिवसांपूर्वी विषारी द्रव प्राशन केले होते.
बीड : मराठा समाजाला आरक्षण नसल्याने सुशिक्षित असूनही नौकरी लागत नाही. त्यातच नापिकीमुळे बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून २० वर्षीय तरूणाने सात दिवसांपूर्वी विषारी द्रव प्राशन केले होते. ही घटना वडवणी तालुक्यातील मामला येथे घडली होती. उपचारादरम्यान त्याचा आज सकाळी जिल्हा रूग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हा रूग्णालय पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे.
दत्ता अनंत लंगे असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. कर्जबारीपणा, नैराश्य, शेतीमालाला कमी भाव, नापीकी आदी समस्यांनी शेतकरी आत्महत्येचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दत्ता लंगे याला दोन एकर शेती आहे. बहिणीचे लग्न व शेतीत पेरणी करण्यासाठी वडवणीतील बँकेचे कर्ज घेतले होते. नापिकीमुळे हे कर्ज कसे फेडायचे. त्यातच आपण सुशिक्षित असतानाही केवळ मराठा समाजाला आरक्षण नसल्याने नौकरी लागत नाही, त्यामुळे तो विंवचनेत होता. यातूनच त्याने सात दिवसांपूर्वी विषारी द्रव प्राशन केले. नातेवाईकांनी त्याला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. सात दिवस त्याने मृत्यूशी झुंज दिली.
दुर्दैवाने शनिवारी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नातेवाईकांनी कर्ज व मराठा समाजाला आरक्षण नसल्याने दत्ता विवंचनेत होता, त्यातूनच त्याने हे पाऊल उचलल्याचा जबाब जिल्हा रूग्णालय पोलीस चौकीत दिला आहे. याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद झाल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.