Maratha Reservation : 'पुन्हा एक मराठा लाख मराठा'; लॉकडाऊननंतर मराठा समाजाचा एल्गार; बीडमध्ये पहिला मोर्चा निघणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 07:26 PM2021-05-06T19:26:22+5:302021-05-06T19:27:56+5:30
Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर गुरुवारी आमदार मेटे यांनी मराठा क्रांती मोर्चा व इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
बीड : मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर बीडमध्ये आमदार विनायक मेेटे यांनी विविध संघटनांची गुरुवारी (६ मे) दुपारी बैठक घेतली. यात राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही अशी टीका केली. लॉकडाऊन संपल्यानंतर समाजाच्या वतीने राज्यभर मोर्चे काढले जाणार आहेत. त्याची सुरुवात बीडमधून केली जाणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर गुरुवारी आमदार मेटे यांनी मराठा क्रांती मोर्चा व इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले, राज्य सरकाच्या नाकर्तेपणामुळे न्यायालयात मराठा आरक्षण टिकू शकले नाही. या निर्णयाचा मोठा परिणाम मराठा समाजातील पुढील पिढीवर होणार आहे. त्यांचे भविष्य अंधारात गेले आहे. त्यामुळे आता शांत बसणे परवडणार नाही. त्यामुळे विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यासोबत बैठक घेऊन २०१६ सालाप्रमाणे मोर्चे काढण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात ७ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ८ तारखेला निदर्शने केले जाणार आहेत. तर, १५ तारखेला लॉकडाऊन संपले तर पुढील काही दिवसांत पहिला मोर्चा बीडमध्ये काढला जाणार आहे.
दरम्यान, आघाडी सरकार व काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीदेखील विनायक मेटे यांनी केली. जोपर्यंत आरक्षणावर निर्णय होत नाही. तोपर्यंत मोर्चे सुरूच राहतील, अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आली आहे, अशी माहिती आ.मेटे यांनी दिली. बैठकीस छावा संघटनेचे अध्यक्ष गंगाधर काळकुटे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक बी.बी. जाधव, गणेश मोरे, सुधीर काकडे, बबन शिंदे यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्र्यांनी पोपटपंची करू नये
आघाडी सरकारच्या विरोधात राज्यभर हा मराठा मोर्चा असणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्याकडे बोट दाखवण्याऐवजी मुख्यमंत्री म्हणून काय भूमिका घेणार हे स्पष्ट करावे. त्यानंतर बाकीची पोपटपंची करावी, अशी टीकादेखील आमदार मेटे यांनी यावेळी केली.