Maratha Reservation : मराठा आरक्षणावर ठोस निर्णय झाल्याशिवाय माघार नाही; परळी येथील ठिय्या आंदोलन सुरूच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 04:49 PM2018-08-02T16:49:30+5:302018-08-02T16:52:05+5:30
मराठा आरक्षणावर ठोस निर्णय झाल्याची माहिती लेखी मिळत नाही तोपर्यंत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरुच राहणार अशी भूमिका आंदोलकांनी आज स्पष्ट केली
बीड : मराठा आरक्षणावर ठोस निर्णय झाल्याची माहिती लेखी मिळत नाही तोपर्यंत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरुच राहणार अशी भूमिका आंदोलकांनी आज स्पष्ट केली. परळी येथील तहसील कार्यालय परिसरात मागील १६ दिवसांपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरु आहे.
मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलकांची आज दुपारी एक बैठक झाली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत समन्वयकांनी आंदोलनाच्या पुढील वाटचालीची माहिती दिली. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा ठोस निर्णय झाल्याचे लेखी द्यावे तेव्हाच आंदोलन स्थगित करण्यात येईल अशी भूमिका आंदोलकांनी जाहीर केली. तसेच ७ ऑगस्ट पर्यत सर्व मागण्या मान्य कराव्यात अन्यथा ९ ऑगस्टपासून संपूर्ण राज्यात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला.
मुख्यमंत्र्यांनी स्वतः निर्णय घ्यावेत
मराठा आरक्षणासाठी चंद्रकांत पाटील यांची उपसमिती बरखास्त करून मुख्यमंत्र्यांनी स्वतः सर्व निर्णय घ्यावीत अशी मागणीसुद्धा यावेळी आंदोलकांनी जाहीर केली.
समाजातील जेष्ट चर्चा करतील
मराठा क्रांती ठोस मोर्चाचे समन्वयकांनी सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे. मात्र या प्रश्नी आता राज्यातील सर्व आमदार आणि मराठा समाजातील जेष्ट यांनीच सरकारशी चर्चा करून निर्णय घ्यावा असे आंदोलकांनी स्पष्ट केले.
बैठकीतील निर्णय :
१. शासकीय व निमशासकीय मेगा भरती आरक्षण जाहीर झाल्यास करावी
२. आरक्षणाबद्दल कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा
३. आंदोकांवरील गुन्हे मागे घ्यावीत