जाळपोळप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, दोषींवर निश्चीत कारवाई होणार- धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 07:09 PM2023-11-05T19:09:26+5:302023-11-05T19:09:59+5:30
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पंचायत समिती, नगरपालिका याठिकाणी झालेल्या जाळपोळ व तोडफोड प्रकरणाचीदेखील पाहणी केली.
माजलगाव- आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर झालेल्या हल्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या निवासस्थांनी भेट देउन पाहणी केली. जाळपोळ, तोडफोड हल्ला प्रकरणी दोषींवर निश्चीतच कारवाई होणार असून या जाळपोळप्रकरणी चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे मुंडेंनी सांगितले.
आ. सोळंके यांच्या निवासस्थांनी आज(रविवार) सायंकाळी ५ वाजता मुंडे यांनी भेट दिली. तसेच, पंचायत समिती, नगरपालिका याठिकाणी झालेल्या जाळपोळ व तोडफोड प्रकरणाचीदेखील पाहणी केली. सोळंके यांच्या निवासस्थांनी बोलताना मुंडे म्हणाले की, हल्ला प्रकरणातील दोषींवर कारवाई निश्चीत होणार. स्थानिक पोलिस व प्रशासनाने मात्र हल्ला घडतेवेळी जमावाला नियंत्रणात ठेवणे आवश्यक होते. नियंत्रण ठेवले असते तर पुढील अनर्थ टळला असता. यावेळी आमदार प्रकाश सोळंके यांनी हे राजकीय षडयंत्र असून अवैध धंदेवाले व धान्याचा काळा बाजार करणारे हल्यामागे असल्याचा आरोपही केला. यावेळी अमरसिंह पंडित, विरेंद्र सोळंके, जयसिंग सोळंके, जयदत्त नरवडे,सुशील डक उपविभागीय अधिकारी निलम बाफणा, तहसिलदार वर्षा मनाळे उपस्थित होते.
तहसीलदारांना झापले....
आमदार सोळंके यांनी शहरातील शासकीय धान्यमाफीया, वाळू माफिया यांच्याबाबत मी चार वेळा तक्रार केली होती, परंतु तहसीलदार यांनी यावर काहीच कारवाई केली नाही, असे सांगितले. यावर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तहसीलदार वर्षा मनाळे यांना सांगितले की, तुम्ही जर लोकप्रतिनिधीचे ऐकत नसाल तर तुमच्यावर हक्कभंगाची कारवाई होऊ शकते, याबाबत तुम्हाला माहिती नाही का ? या धंद्यांवर तात्काळ कारवाई करा असेही यावेळी तहसीलदार यांना सुनावले.