देशातील पहिल्या इंटरसिटी इलेक्ट्रिक बस' शिवाई'च्या डिझाईनमागे मराठमोळा मिलिंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 05:32 PM2022-06-04T17:32:02+5:302022-06-04T17:32:54+5:30
सार्वजनिक सेवेतील 'शिवाई' बसचे डिझाईन आधुनिक स्वरूपातील असून परदेशातील बस सारखे आहे, असे कौतुक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
- पुरूषोत्तम करवा
माजलगाव (बीड) : सर्वसामान्यांची लालपरी आता आधुनिक होत नव्या ढंगात रस्त्यावर उतरली आहे. देशातील पाहिली इंटरसिटी कोच असलेली आणि एसटीची पहिली इलेक्ट्रीक बस 'शिवाई' प्रवाशांच्या सेवेत महामंडळाच्या स्थापना दिनी १ जून रोजी दाखल झाली आहे. ही इलेक्ट्रीक बस पुणे-अहमदनगर दरम्यान धावणार आहे. जागतिक दर्जाची सुरक्षा आणि सुविधा असलेल्या या बसच्या डिझाईन मागे मराठमोळा इंजिनिअर बीड जिल्ह्याच्या भूमिपुत्र मिलिंद कुलकर्णी आहे. मिलिंद याच्या उत्तुंग यशाचे जिल्हावासीयांमधून कौतुक होत आहे.
एसटी महामंडळाच्या स्थापना दिनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एसटीची पहिली इलेक्ट्रिक बस 'शिवाई' चे लोकार्पण करण्यात आले. नगर - पुणे महामार्गावर प्रवाशांच्या सेवेत सुरु झालेल्या सार्वजनिक सेवेतील 'शिवाई' बसचे डिझाईन आधुनिक स्वरूपातील असून परदेशातील बस सारखे आहे, असे कौतुक यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. आधुनिकता आणि सुरक्षेचा समन्वय साधून पुण्याच्या सिट्ीन इंजिनिअरिंग अॅटोमोटिव्ह डिझाईनिंगच्या मिलिंद कुलकर्णी यांनी याचे डिझाईन तयार केले आहे. २०११ पासून या क्षेत्रात असलेल्या कुलकर्णी यांनी 'शिवाई' रस्त्यावर उतरण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रकारची सर्टीफिकेशन सुद्धा उपलब्ध केली. त्यानंतर दिल्ली येथे बसची बांधणी झाली.
खेडेगाव ते बंगलोरमध्ये झाले शिक्षण
मिलिंद हे बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील माजी मुख्याध्यापक स्व. रत्नाकरराव कुलकर्णी यांचा मुलगा आहे. मोठा भाऊ डॉ. स्वानंद कुलकर्णी वैद्यकीय क्षेत्रात तर लहान मिलिंद अभियांत्रिकीमध्ये नाव कमावत आहे. मिलिंद यांचे पहिली ते दहावीचे शिक्षण माजलगावात तालुक्यातील लवुळ येथील गजानन विद्यालयत झाले. तर औरंगाबाद येथील जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग महाविद्यालयात त्यांनी मॅकॅनिकल विषयात पदवी घेतली. बेंगलोर येथे अॅटोमोटिव्ह विषयात पदव्युत्तर शिक्षणांनंतर मिलिंद यांनी औरंगाबाद आणि पुण्यात नामंवत कंपन्यांमध्ये काही काळ नोकरी केली.
धाडसाने नाव कमावले सोबत रोजगार निर्मिती केली
२०११ साली धाडसकरून त्यांनी पुण्यात एका मित्रासोबत मिळून सिट्ीन इंजिनिअरिंग अॅटोमोटिव्ह डिझाइनिंग कंपनीची स्थापन केली. अल्पवधीत कंपनीने देश - विदेशातील नामांकित कंपन्यांसाठी अॅटोमोटिव्ह डिझाइनिंगचे काम केले आहे. आता 'शिवाई' या देशातील पहिल्या इंटरसिटी कोच असलेल्या बसच्या डिझाईनचे काम त्यांच्या कंपनीने केले. सुरक्षा आणि सुविधेला प्राधान्य देत केलेल्या डिझाईनमुळे ही बस जागतिक दर्जाची झाल्याचे कौतुक मान्यवरांनी केले आहे. मिलिंद यांनी धाडस करून सुरु केलेल्या कंपनीने अनेकांना रोजगार मिळवून दिला आहे. त्यांच्या या यशाने बीडकरांचा उर अभिमानाने भरून आला आहे.
असे आहेत 'शिवाई' बसचे वैशिट्य
एसटी महामंडळाने इलेक्ट्रिक बससेवा सुरू झाल्याने प्रदुषणमुक्त वाहनांतून प्रवाशांना प्रवास करणे आता अधिक सोयीचे होणार आहे. 'शिवाई' च्या डिझाईनसाठी अकरा महिने लागले. ही बस वातानुकुलीत असून याची लांबी 12 मिटर आहे. यात दोन बाय दोनचे सिट्स आहेत. बसची आसनक्षमता 43 प्रवाशी असून वेग ताशी 80 किलोमिटर इतका आहे. ध्वनी व प्रदुषणमुक्त असलेल्या या बसमध्ये कॅमेरा सिस्टम बसविण्यात आले आहे. याची बॅटरी 322 केव्हीची आहे. यातील बॅटरीची 80 ते 90 वेळा चाचणी केल्यानंतरच वापरासाठी शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे बस पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती मिलिंद यांनी दिली.
भविष्य इलेक्ट्रिक वाहनांचे
भारतात २०३० पर्यंत ७० टक्के वाहने इलेक्ट्रिक असतील. याची सुरुवात सार्वजनिक स्वरूपातील एसटी महामंडळाने करून मोठे पाऊलं टाकले आहे. आमच्या पुढील योजनेत सध्याच्या डीझेल बस इलेक्ट्रिक कशा करता येतील याचा समावेश आहे. 'शिवाई' या देशातील पहिल्या इंटरसिटी पहिल्या प्रवासी बसचे डिझाईन व डेव्हलपमेंटचे काम केल्याचा मनस्वी आनंद आहे.
- मिलींद कुलकर्णी, संचालक, सिट्ीन इंजिनिअरिंग अॅटोमोटिव्ह डिझाइनिंग