मराठवाड्यात धुमाकूळ; बीडच्या गँगवर ‘मोक्का’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 11:59 PM2019-02-08T23:59:30+5:302019-02-09T00:00:08+5:30
बीडसह मराठवाड्यात चोरी, दरोडे, घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीडसह मराठवाड्यात चोरी, दरोडे, घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.
संतोष ओंकार गायकवाड (२३ रा.रामनगर ता.गेवराई), अक्षय भानुदास जाधव (२४ सावरखेडा ता.गंगापूर जि.औरंगाबाद), दीपक बबन गायकवाड (२८ रा.लवूळ ता.माजलगाव), बबन मोतीराम गायकवाड (५६ रा.लवूळ ता.माजलगाव) यांच्यासह अन्य एकाचा टोळीत समावेश आहे. शहाजी भगवान कदम (५५ रा.गवारी ता.बीड) यांचे गवारी फाटा येथे हॉटेल आहे. ६ जानेवारी रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ते हॉटेलची सफाई करीत होते.
एवढ्यात काळ्या रंगाच्या जीपमधून आलेल्या दरोडेखोरांनी कदम यांच्या गळा दोरीने आवळूण व गळ्याला चाकू लावून हॉटेलच्या गल्यातील १७५० रूपये काढून घेतले. तसेच हॉटेलच्या बाजूला शहादेव लोमटे हे ट्रकमध्ये झोपले होते. त्यांनाही मारहाण करून ते पसार झाले. मारहाण झालेली असतानाही कदम यांनी समयसुचकता दाखवित लाईटच्या उजेडाने जीपचा क्रमांक कैद केला. त्यानंतर या प्रकरणाची नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
त्यानंतर पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या आदेशाने विशेष पथके नियूक्त करून चारही दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. त्यांचे रेकॉर्ड काढले असता हे अट्टल दरोडेखोर असल्याचे समोर आले. त्यांनी बीडसह मराठवाड्यात धुमाकूळ घातल्याचे समोर आले.
हाच धागा पकडून नेकनूरचे पोनि भाऊसाहेब गोंदकर यांनी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांच्याकडे मोक्काअंतर्गत कारवाईबाबत प्रस्ताव पाठविला. मुत्याल यांच्याकडून त्याला मंजुरीही मिळाली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, पोनि भाऊसाहेब गोंदकर, पोउपनि औटे, मजहर, आधटराव, अभिमन्यू औताडे आदींनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले करत आहेत.
मोक्का, एमपीडीएने गुन्हेगारांमध्ये दहशत
मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात गुन्हेगारी करून धुमाकूळ घालणाºयांवर पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी कारवायांचा फास आवळला आहे. मोक्कासह एमपीडीए कारवायांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये बीड पोलिसांची दहशत निर्माण झाली आहे.