कारला साईड न दिल्याने युवासेनेच्या मराठवाडा सचिवावर हल्ला; चौघांना अटक अन् सुटका
By सोमनाथ खताळ | Published: July 18, 2023 12:18 AM2023-07-18T00:18:15+5:302023-07-18T00:19:03+5:30
कारला साईड न दिल्याने हा हल्ला केल्याचे तपासात समोर आले आहे.
सोमनाथ खताळ, बीड : युवासेनेचे (ठाकरे गट) मराठवाडा सचिव विपुल पिंगळे यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी पाचजणांविरोधात बीड शहर पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील चौघांना अटक करून सूचनापत्रावर सोडण्यात आले. हा हल्ला राजकारणातून झाल्याचा संशय होता. परंतु, कारला साईड न दिल्याने हा हल्ला केल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विपुल पिंगळे यांनी पोलिस अधीक्षकांना भेटून केली आहे.
विपुल पिंगळे हे रविवारी सायंकाळी आपल्या कारमधून घरी जात होते. साठे चाैकापासून एक पांढऱ्या रंगाची कार त्यांचा पाठलाग करत होती. सारखे हॉर्न वाजवत साईड मागत होते. परंतु, वाहतूक कोंडी असल्याने पिंगळे यांचे चालक अविनाश पवार यांनी तशीच कार छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत आणली. यावेळी पांढऱ्या रंगाच्या कारमधील पाच तरुणांनी खाली उतरत आगोदर पवार यांना आणि नंतर पिंगळे यांना मारहाण केली. यात पिंगळे यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. त्यांनी जिल्हा रुग्णालयात उपचार घेऊन सोमवारी सकाळी ते घरी गेले. त्यानंतर दुपारी त्यांनी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेत हल्लेखोरांना अटक करून कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर बीड शहर पोलिसांनी पाचपैकी चौघांना ताब्यात घेत सूचनापत्रावर त्यांना सोडून दिले. हा हल्ला राजकारणातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. परंतु, पोलिस तपासात यामागे राजकारण नसून, केवळ साईड न दिल्याच्या रागातून हल्ला केल्याचे उघड झाले आहे.
विपुल पिंगळे यांना मारहाण केल्याप्रकरणी पाचजणांविरोधात गुन्हा दाखल आहे. पैकी चौघांना अटक केली होती. त्यांना सूचनापत्रावर सोडण्यात आले आहे. उर्वरित एका आरोपीलाही अटक करण्यात येईल. आरोपींची नावे सांगता येणार नाहीत. - मुकूंद कुलकर्णी, पोलिस निरीक्षक, बीड शहर