मराठवाड्याचे भूषण परळीचे औष्णिक विद्युत केंद्र झाले ५२ वर्षांचे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 12:25 PM2023-11-16T12:25:40+5:302023-11-16T12:26:35+5:30

गेल्या ५२ वर्षात पाच संच बंद झाले असून नवीन तीन संच सुरू झाले आहेत.

Marathwada's Bhushan Parali thermal power station turns 52 years old | मराठवाड्याचे भूषण परळीचे औष्णिक विद्युत केंद्र झाले ५२ वर्षांचे

मराठवाड्याचे भूषण परळीचे औष्णिक विद्युत केंद्र झाले ५२ वर्षांचे

-संजय खाकरे
परळी:
मराठवाड्याचे भूषण असलेल्या परळी औष्णिक विद्युत केंद्राचा ५२  वा वर्धापन दिन १५ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला. गेल्या ५२ वर्षात पाच संच बंद झाले असून नवीन तीन संच सुरू झाले आहेत. सद्या ६०० मेगावॉट एवढी  वीज निर्मिती होत आहे.

परळी औष्णिक विद्युत केंद्रातील   संच क्रमांक १,२,३,४,५ ते सर्व संच आयुर्मान संपल्यामुळे बंद ठेवून लिलावात काढण्यात आले आहे तर संच क्रमांक ६,७,८  हे तीन नवीन संच नवीन परळीऔष्णिक विद्युत केंद्रात चालू आहेत या तीन संचाची एकूण स्थापित क्षमता   ७५०  मेगावॅटएवढी असून हे तिन्ही संच सध्या क्षमतेच्या जवळपास वीज निर्मिती करीत आहेत.

औष्णिक विद्युत केंद्र हे परळीची अर्थवाहिनी म्हणून ओळखले जाते. या विद्युत केंद्रातील संच क्रमांक ९ ही मंजूर आहे परंतु त्याची उभारणी अद्याप करण्यात आलेली नाही. २९ मे १९६६ रोजी भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते परळी औष्णिक विद्युत केंद्राचा कोनशीला समारंभ झाला.     परळी औष्णिक विद्युत केंद्रात १५ नोव्हेंबर १९७१ मध्ये ३० मेगावॅट क्षमतेचा पहिला संच कार्यान्वित करण्यात आला होता. तर १७ मे १९७२ रोजी दुसरा संच ३० मेगावॅटचा कार्यान्वित झाला होता . १० ऑक्टोबर १९८० मध्ये पहिला २१० मेगावॅटचा  संच (संच क्रमांक ३) सुरू करण्यात आला होता.२६ मार्च १९८५  मध्ये २१० मेगावॅटचा संच (संच क्रमांक ४) कार्यान्वित झाला होता तर संच क्रमांक ५ हा ३१ डिसेंबर १९८५  मध्ये कार्यान्वित झाला होता. हे पाच ही संच चालू होते. तेव्हा भारत सरकारचा वीजनिर्मिती बद्दल महत्तम उत्पादकता पुरस्कार तसेच इंधन तेल बचतीचा पुरस्कार १९९८ पर्यंत प्राप्त झाले आहे विविध पुरस्कारांनी परळीचे औष्णिक विद्युत केंद्र गौरविण्यात आलेले आहे. तसेच सामाजिक वनीकरण महाराष्ट्र राज्य यांच्या च्याकडून राख बंधाऱ्यावर वनराई उभी केल्याबद्दल वनश्री  प्रथम पुरस्कार १९९५ मध्ये प्राप्त झाला होता. आज ही पाच संच बंद असून महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने हे संच लिलावात काढले आहे. तसेच राख बंधारा ही नष्ट झाला आहे.

दरम्यान, सध्या संच क्रमांक ६,७, व ८ हे तीन संच चालू आहेत. वीज निर्मितीसाठी लागणारा कोळसा रेल्वे ट्रॅकने वणी येथून येतो.  खडका येथील धरणातून पाणीपुरवठा होतो. तीन संचातून वीज निर्मिती चालू आहे हे तिन्ही संच अत्याधुनिक असून मनुष्यबळ कमी लागणारे संच आहेत. जुन्या औष्णिक विद्युत केंद्रात पाच संच चालू असताना मोठ्या प्रमाणात अधिकारी, कर्मचारी, कामगार  वर्ग कार्यरत होता. त्यामुळे परळी बाजारपेठेत भरभराट निर्माण झाली होती जुने संच बंद झाल्याचा परळीच्या बाजारपेठेवर मोठ्या परिणाम जाणू लागला आहे.

Web Title: Marathwada's Bhushan Parali thermal power station turns 52 years old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.