पुढील आदेशापर्यंत आठवडी बाजार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 11:41 PM2020-03-16T23:41:18+5:302020-03-16T23:41:55+5:30
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासन व प्रशासनामार्फत विविध उपाय केले जात आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील जवळपास सर्वच आठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक संस्थांनी घेतला आहे.
बीड : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासन व प्रशासनामार्फत विविध उपाय केले जात आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील जवळपास सर्वच आठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक संस्थांनी घेतला आहे. दरम्यान, धारुर व परळी येथे सोमवारी बाजार भरला. यापुढे मात्र बाजार बंद राहणार असल्याच्या सूचना नागरिकांना दिल्या.
अंबाजोगाई शहरातील आठवडी बाजार बंद
अंबाजोगाई : शहरात मंगळवारी मोंढा परिसरात, शुक्रवारी मांडवा रोड, तर रविवारी यशवंतराव चव्हाण चौक येथे आठवडी बाजार भरतो. या सर्व बाजारातून मोठी आर्थिक उलाढाल होते. तालुक्यात घाटनांदूर, ममदापूर, देवळा येथे ही आठवडी बाजार भरतो.हे सर्व बाजार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आले आहेत.
परळीतील दोन्ही बाजार नेहमीप्रमाणे भरले
परळी : येथील हायबे रोड, वैद्यनाथ बँक रोडवर दर सोमवारी भरणारा भाजीपाला व किराणा दुकानाचा आठवडी बाजार दर सोमवारप्रमाणे भरला. गुरांचा बाजारही वैद्यनाथ मंदिर समोरील जागेत भरला. गुरांच्या बाजारात आज गर्दी दिसून आली. नगर परिषदेच्या वतीने सोमवारचा परळीतील आठवडी बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या तरीही सोमवारी दोन्हीही बाजार भरलेले होते. नगर परिषदेच्या वतीने अनाऊन्सिंगचे काम चालू असल्याची माहिती नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे यांनी दिली. शहरातील विविध बँकेतही गर्दी दिसून आली. वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी परराज्यातील भाविकांची संख्या मात्र रोडावलेली दिसली.
गेवराईचा बाजार बंद
गेवराई : शहरात बुधवारी भरणारा सर्वात मोठा आठवडी बाजार बंद ठेवला असून, याच्या सूचना सर्व व्यापारी व नागरिकांना केल्याचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. या बाजारात जवळपासच्या गावातील नागरिक व व्यापारी भाजीपाला, किराणा, कापड, बूट, चप्पल खरेदीसाठी येतात. हा आठवडी बाजार बंद राहणार असून, याची माहिती नगर परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी या रोगापासून दूर राहण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जावू नये असे आवाहन येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी सांगितले.
साळेगावचा जनावरांचा आठवडी बाजार बंद
केज : तालुक्यातील साळेगाव येथे दर गुरुवारी भरणारा जनावरांचा बाजार भरतो. येथे गाई, बैल, म्हशी, शेळ्या, मेंढ्या विक्रीसाठी व खरेदीसाठी तालुक्यातील व बीड, उस्मानाबाद, लातूर, पुणे, सातारा, कराड, सोलापूर या जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातूनही व्यापारी व पशुपालक येत असतात. सदरील बाजार हा ३१ मार्च पर्यंत भरणार नाही. तसेच या बाबत पुढील आदेश येईपर्यंत कार्यवाही होणार असल्याची माहिती सरपंच कैलास जाधव यांनी दिली.
लो. सावरगावात दवंडी
लोखंडी सावरगाव येथे बुधवारी भरणाऱ्या बाजारात परिसरातील श्रीपतरायवाडी, सनगाव, वरपगाव, हिवरा, डिघोळ अंबा, कोदरी, होळ, बोरी सावरगाव, लाडेगाव येथून शेतकरी, अंबाजोगाई येथून व्यापारी भाजीपाला घेऊन येतात. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून ग्रामपंचायतच्या वतीने दवंडी देऊन बुधवारी भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला आहे.
पुढील बाजारापासून न येण्याच्या सुचना
धारूर : शहरात सोमवारी आठवडी बाजार असल्याने भाजीपाला विक्रेते आले होते. त्यांना विक्री करण्यास मुभा दिली मात्र शुक्रवारी भरणाºया बाजारापासून पुढील आदेश येऊपर्यंत आठवडी बाजार बंद राहतील व सर्व सार्वजनिक कार्यक्रम बंद ठेवण्याच्या सूचना नगरपालिकेच्या वतीने शहरात ध्वनीक्षेपकाद्वारे देण्यात आली. शहरासह तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद आहेत. बाजारपेठेत व्यवहारावर यांचा परिणाम झाला आहे.