बाजार समिती निवडणुका सहा महिने पुढे ढकलल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:43 AM2021-04-30T04:43:07+5:302021-04-30T04:43:07+5:30
राज्यातील कोरोना परिस्थितीमुळे सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यातील सेवा संस्था आणि ग्रामपंचायत निवडणूक झाल्याशिवाय बाजार ...
राज्यातील कोरोना परिस्थितीमुळे सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यातील सेवा संस्था आणि ग्रामपंचायत निवडणूक झाल्याशिवाय बाजार समिती निवडणूक घेता येत नाही. त्यामुळे आता राज्यातील बाजार समित्यांची निवडणूक ६ महिने म्हणजे ऑक्टोबर महिन्यापर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून तसे आदेश काढले आहेत. या काळात विद्यमान संचालक मंडळ काम पाहणार आहे. मात्र, त्यांना कोणतेही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. तर केवळ कामकाज सुरळीत राहावे, यासाठी त्यांची नियुक्ती असेल. जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई, वडवणी आदी बाजार समित्यांची मुदत संपलेली आहे.
---
अंबाजोगाई बाजार समितीवर पुन्हा प्रशासक?
राज्य शासनाने अंबाजोगाई बाजार समितीवर प्रशासक मंडळ नेमले होते. मात्र याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानंतर न्यायालयाने सुरुवातीला हा निर्णय स्थगित केला होता. मात्र नंतर विद्यमान संचालक मंडळ दोषी असल्याचे न्यायालयासमोर मांडण्यात आले. त्यामुळे न्यायालयाने विद्यमान संचालकांची मुदतवाढीची विनंती फेटाळली होती. आता राज्य सरकारने नवीन आदेशात ज्या संचालक मंडळाची चौकशी सुरू आहे, असे संचालक मंडळ वगळून इतरांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अंबाजोगाई बाजार समितीवर आता पुन्हा प्रशासक येईल हे स्पष्ट आहे.