बाजार समितीला मंडप, नाष्ट्याचा विनाकारण भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:25 AM2021-06-06T04:25:20+5:302021-06-06T04:25:20+5:30
माजलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने ग्रामीण रुग्णालयात लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सावलीसाठी मंडप तसेच चहा व नाष्ट्याची ...
माजलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने ग्रामीण रुग्णालयात लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सावलीसाठी मंडप तसेच चहा व नाष्ट्याची सोय केली होती; परंतु लस घ्यायला हातांवर बोटांवर मोजण्याएवढेच लोक येत असल्याने बाजार समितीस विनाकारण भुर्दंड बसू लागला आहे.
माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात तीन-चार महिन्यांपासून नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी संबंधित विभागाने पाण्याचीदेखील सोय केली नव्हती. एप्रिलमध्ये कडाक्याचे ऊन असल्याने येणाऱ्या नागरिकांना पाच-सहा तास वेळ लागत असल्याने व त्यांना या ठिकाणी सावली व पिण्याचे पाणीसुद्धा मिळत नसल्याने त्यांचे हाल होऊ लागले. विशेष म्हणजे या ठिकाणी लस घेण्यासाठी येणाऱ्यांमध्ये वृद्धांचीच जास्त संख्या होती.
उन्हाळ्यात अनेक ठिकाणी सामाजिक संघटना पाणपोई चालू करीत असत; परंतु लस घेण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी कोणीच पाण्याचीदेखील सोय केली नव्हती. या ठिकाणी वेळ लागत असल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत असल्याचे पाहून बाजार समिती सभापती भारत शेजूळ यांनी या ठिकाणी मे महिन्यात मंडप टाकून सावलीची तसेच चहा व नाष्ट्याची सोय केली होती.
शासनाकडून लसीचा अपुरा पुरवठा होत असल्याने व दुसरी लस देण्यासाठी कालावधी वाढविल्याने तसेच ऑनलाईन बुकिंग केल्याने लसीसाठीची गर्दी एकदम कमी झाली आहे. लस देण्यासाठी आता केवळ बोटांवर मोजण्याइतकेच लोक येत आहे. यामुळे नागरिकांना तत्काळ लस मिळू लागल्याने सावलीसाठी टाकण्यात आलेल्या मंडपात कोणीच थांबत नाहीत. चहा घेण्यासाठी व नाष्टा करण्यासाठी लस घेणाऱ्यांऐवजी बाहेरील लोक येत आहेत. यामुळे बाजार समितीस एक महिन्यापासून मंडप, चहा व नाष्ट्याचा विनाकारण भुर्दंड बसू लागला आहे.
सभापतींना याबाबत माहिती देऊन पुढील नियोजन करण्यात येईल.
- हरिभाऊ सवने, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, माजलगाव.
===Photopath===
050621\img_20210605_121552_14.jpg