केंद्रीय समितीकडून शाळांसह बाजारपेठेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:51 AM2018-03-01T00:51:15+5:302018-03-01T00:58:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : स्वच्छ सर्वेक्षण - २०१८ अंतर्गत बीड शहर तपासणीसाठी मागील तीन दिवसांपासून केंद्रीय समिती बीडमध्ये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : स्वच्छ सर्वेक्षण - २०१८ अंतर्गत बीड शहर तपासणीसाठी मागील तीन दिवसांपासून केंद्रीय समिती बीडमध्ये तळ ठोकून आहे. बुधवारी शाळा, महाविद्यालयांसह निवासी तसेच बाजारपेठ परिसराची पाहणी केली. तीन दिवसांचा हा दौरा होता. परंतु तपासणी पूर्ण न झाल्याने गुरूवारीही शहराची तपासणी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बीड नगर पालिकेच्या वतीने मागील काही दिवसांपासून शहर स्वच्छतेसाठी पाऊले उचलली आहेत. याच्या तपासणीसाठीच केंद्रीय समिती बीडमध्ये आली आहे. दोन दिवस कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर बुधवारी समितीने शहरातील काही ठराविक परिसरांची पाहणी केली. पेठबीड, मित्रनगर आदी निवासी परिसरांची पाहणी केली. त्यानंतर सुभाष रोड, महात्मा फुले भाजी मार्केट, बलभीम चौक या व्यापारपेठेची तपासणी केली.
सायंकाळच्या सुमारास कनकालेश्वर विद्यालय, सेंट अॅन्स स्कूल, संस्कार विद्यालयाला भेट देऊन या शाळांनी स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभाग नोंदविला की नाही, याची माहिती घेतली. या सर्व शाळांनी सहभाग नोंदवून पालिकेला सहकार्य केल्याचे समोर आले. रात्री उशिरापर्यंत ही तपासणी सुरूच होती. मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांच्याकडून पूर्ण शहराची माहिती समितीने घेतली. यावेळी डॉ. जावळीकर यांच्यासह श्रद्धा गर्जे, स्वच्छता विभाग प्रमुख व्ही.टी.तिडके, आर.एस. जोगदंड, भागवत जाधव, सुनील काळकुटे, भारत चांदणे, रमेश डहाळे आदींची उपस्थिती होती.
गुणांसाठी धडपड
केंद्रीय समितीपुढे आपण कुठे कमी पडणार नाही, आपल्या चुकीमुळे एक गुण कमी होणार नाही, याची पूर्ण खबरदारी नगरपालिका अधिकारी, कर्मचारी घेत आहेत. समितीकडून शहर तपासणीचा आढावा आॅनलाईन पोहचविला जात होता.