विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:21 AM2019-03-21T00:21:47+5:302019-03-21T00:22:57+5:30
जनावरांना पिण्यासाठी पाणी शेंदताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने विवाहितेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील कोद्री येथे मंगळवारी दुपारी घडली.
अंबाजोगाई / केज : जनावरांना पिण्यासाठी पाणी शेंदताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने विवाहितेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील कोद्री येथे मंगळवारी दुपारी घडली.
प्रियंका प्रदीप लुंगारे (वय २१, रा. कोद्री, ता. अंबाजोगाई) असे त्या विवाहितेचे नाव आहे. मंगळवारी दुपारी ३.४५ वाजता जनावरांना पाणी देण्यासाठी शेतात गेली होती. स्वत:च्या शेतातील विहिरीतून पाणी शेंदत असताना तोल गेल्याने ती विहिरीत पडली. विहिरीत भरपूर पाणी असल्याने बुडून तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस जमादार अभंग यांनी पंचनामा करून अहवाल सादर केला. प्रियंकाचे लग्न तीन वर्षांपूर्वी प्रदीपसोबत झाले होते. त्यांना दीड वर्षाची एक मुलगी आहे.
दरम्यान, मयत प्रियकांचे वडील राजाभाऊ विभूते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शेतात बोअर घेण्यासाठी माहेरहून ७० हजार रुपये आणावेत म्हणून पती प्रवीण लुंगारे, सासरा मधुकर लुंगारे, सासू मीरा लुंगारे, दीर संदीप लुंगारे यांनी तगादा लावला होता. तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात असे. या छळाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. यानुसार चौघांविरुद्ध युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक आनंद झोटे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अश्विनी कुंभार या तपास करीत आहेत.
नातेवाईकांनी रोखले होते शवविच्छेदन
दरम्यान, प्रियंका तोल जाऊन पडली नसून तिला सासरच्या मंडळींनी विहिरीत ढकलून मारल्याचा आरोप करत माहेरच्यांनी शवविच्छेदन रोखून धरले होते. यामुळे ‘स्वाराती’च्या न्यायवैद्यक विभागाच्या परिसरात तणावाचे वातावरण झाले होते. परंतु, पोलिसांनी प्रियंकाच्या नातेवाईकांची समजूत घातल्यानंतर त्यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला.