'लग्न,पैसा आणि धोका'; मुलानेच २ लाख हुंडा देऊन थाटात विवाह केला, ८ दिवसांनंतर नवरी भुर्रर्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 03:48 PM2022-04-15T15:48:54+5:302022-04-15T15:49:43+5:30

या मुलीचा यापूर्वी विवाह झालेला असून तिला दोन अपत्ये असल्याचे समजताच शोध घेणाऱ्या नवरदेवाच्या नातेवाइकांना धक्काच बसला.

'Marriage, money and fraud'; The boy gave dowry of Rs 2 lakh to girl, after eight days of marriage newly married girl run away | 'लग्न,पैसा आणि धोका'; मुलानेच २ लाख हुंडा देऊन थाटात विवाह केला, ८ दिवसांनंतर नवरी भुर्रर्र!

'लग्न,पैसा आणि धोका'; मुलानेच २ लाख हुंडा देऊन थाटात विवाह केला, ८ दिवसांनंतर नवरी भुर्रर्र!

googlenewsNext

गेवराई ( बीड ) : दोन लाख रुपये घेतल्यानंतर नवरीसह तिच्या नातेवाइकांनी लग्नाला होकार दिला. त्यानंतर मुलाकडील मंडळीने स्वखर्चाने मोठ्या उत्साहात लग्न समारंभ केला. मात्र लग्नाच्या आठ दिवसांनंतर नवरी व तिचा मोबाईल नॉटरिचेबल झाला. या मुलीचा यापूर्वी विवाह झालेला असून तिला दोन अपत्ये असल्याचे समजताच शोध घेणाऱ्या नवरदेवाच्या नातेवाइकांना धक्काच बसला. फसवणूक झालेल्या नवरदेवाच्या फिर्यादीवरून नवरी मुलीसह पाच जणांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल फिर्यादीनुसार, गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथील कृष्णा अशोक फरताळे या मुलाला आरोपी रामकिसन जगन्नाथ तापडिया (रा. सालवडगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) या व्यक्तीने औरंगाबाद येथील एका मुलीचे स्थळ आणले. दरम्यान, नवरी मुलगी रेखा चौधरी व इतर चौघांनी दोन लाख देत असाल तर लग्नास सहमती दर्शवली. त्यानुसार नवरीकडील मंडळींना रोख ६० हजार व १ लाख ४० हजारांचा धनादेश देण्यात आला. गेवराई तालुक्यातील बोरीपिंपळगाव फाट्यावरील एका मंगल कार्यालयात २० जुलै २०२१ रोजी लग्न समारंभ थाटात पार पडला. दरम्यान, दिलेला धनादेश आठ दिवसांत वटताच नवरी मुलगी रेखा माहेरी गेली. 

यानंतर वेळोवेळी वेगवेगळे कारणे देत ती परत आलीच नाही. नंतर काही दिवसांनी तिचा मोबाईलदेखील बंद झाला. या मुलीचा आठ वर्षांपूर्वी काकासाहेब भाऊसाहेब पठाडे या व्यक्तीशी विवाह झाला असून त्यांना दोन अपत्ये असल्याचे नवरदेवाकडील मंडळींना समजल्याने धोका झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी मुलीचे स्थळ आणलेले रामकिसन जगन्नाथ तापडिया यांना संपर्क साधला. मात्र, त्यांनी तुम्हाला काय करायचे ते करा म्हणत फोन बंद केला.

फसवणूक झालेला नवरदेव मुलगा कृष्णा फरताळे यांच्या फिर्यादीवरून संतोष विश्वनाथ शिंदे, सुनीता बाळू चौधरी, रेखा बाळू चौधरी (रा. जाधववाडी, औरंगाबाद सिडको), रामकिसन जगन्नाथ तापडिया (रा. सालवडगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) व विठ्ठल किसन पवार (रा. सावरखेडा, ता. गंगापूर) या पाच जणांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात कलम ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल साजिद सिद्दिकी हे करीत आहेत.

Web Title: 'Marriage, money and fraud'; The boy gave dowry of Rs 2 lakh to girl, after eight days of marriage newly married girl run away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.