१५ वर्षांच्या मुलीचा विवाह; सासरी येताना नजर चुकवत तिने गाठले थेट पोलीस ठाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 07:12 PM2022-08-17T19:12:10+5:302022-08-17T19:12:24+5:30

या प्रकरणी आई-मामा, पतीसह चौघांवर गुन्हा : मुलगी जालन्याच्या सुधारगृहात

Marriage of 15-year-old girl; she directly reached the police station In Jalana | १५ वर्षांच्या मुलीचा विवाह; सासरी येताना नजर चुकवत तिने गाठले थेट पोलीस ठाणे

१५ वर्षांच्या मुलीचा विवाह; सासरी येताना नजर चुकवत तिने गाठले थेट पोलीस ठाणे

Next

पाटोदा (जि. बीड) : जेमतेम १५ वर्षांच्या जळगाव येथील मुलीचा बळजबरीने पाटोदा तालुक्यातील तरुणाशी विवाह लावून दिला. सासरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या सासऱ्याची नजर चुकवून तिने जळगाव बसस्थानकातून अंबड (जि. जालना) गाठले. त्यानंतर पोलिसांना आपबीती सांगितली. अंबड पोलिसांनी गुन्हा नोंदवून तो १२ ऑगस्ट रोजी पाटोदा पोलिसांकडे वर्ग केला. आई, मामा, पती व सासरा हे यात आरोपी आहेत.

जळगाव येथील १५ वर्षीय मुलीच्या वडिलांचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांनी तिचा विवाह पाटोदा तालुक्यातील एका तरुणाशी ठरवला होता. मात्र, तिच्या आई व मामा यांनी ती अल्पवयीन असतानाही त्या तरुणाशी विवाह लावून दिला. लग्नानंतर तिने पती पसंत नसल्याचे सांगून मला माहेरी घेऊन जा, अशी विनंती आई आणि मामाकडे केली. त्यामुळे त्यांनी तिला जळगावला परत आणले. २३ जुलै रोजी तिचा सासरा घेण्यासाठी आला. सासरी निघालेल्या मुलीने जळगाव बसस्थानकातून सासऱ्याची नजर चुकवली व दुसऱ्या बसने अंबडला पोहोचली. अंबड पोलिसांनी स्थानकात पोहोचून तिला धीर दिला. तिच्या तक्रारीवरून आई, मामा, पती आणि सासऱ्यावर बालविवाह प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंदविला आहे. हा गुन्हा पाटोदा पोलिसांकडे वर्ग झाला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती सहायक निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार यांनी दिली.

मुलगी सुधारगृहात
दरम्यान, आई, मामा, पती व सासरा यांच्यावर गुन्हा नोंदविल्यानंतर या मुलीला जवळच्या कोणत्याही नातेवाईकाचा आधार नाही. त्यामुळे तिला जालना येथील सुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

Web Title: Marriage of 15-year-old girl; she directly reached the police station In Jalana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.