फूस लावून पळवून नेत अल्पवयीन मुलीसोबत केले लग्न; आरोपीला सोलापुरात अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 01:05 PM2022-07-09T13:05:38+5:302022-07-09T13:06:12+5:30
लग्न करून फोटो सोशल मीडियावर केले होते व्हायरल
कडा (बीड) : कडा पोलिस चौकीच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवुन नेण्याची घटना घडली होती. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा ८ जुन रोजी नोंद करण्यात आला होता. दरम्यान, शुक्रवारी पोलिसांनी आरोपीच्या सोलापुरात मुसक्या आवळल्या. तर अल्पवयीन मुलीस बीड येथील सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे.
आष्टी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस केरूळ येथील अक्षय बाळु भोज ( २५ ) वर्ष याने फुस लावुन मुलीला ७ जुन रोजी पळवून नेले. ८ जुन रोजी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तांत्रिक माहितीच्या आधारे धागेदोरे मिळताच सोलापुर जिल्ह्यातील संगम या गावात जाऊन आरोपी अक्षय बाळू भोज, महेश बाळू भोज यांच्या मुसक्या आवळल्या. अल्पवयीन मुलीस बीड येथील सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
आष्टी पोलिस ठाण्यात अपहरण, बाललैगिक अत्याचार, अॅस्ट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, पोलीस निरीक्षक सलिम चाऊस, सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, याच्या मार्गदर्शनाखाली कडा चौकीचे सहाय्यक फौजदार राजेद्र पवार, पोलिस हवालदार बाबासाहेब गर्जे, बाबासाहेब राख , पोलिस अंमलदार मंगेश मिसाळ, पोलिस अंमलदार बंडु दुधाळ यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे केली.
लग्नाचे फोटो व्हायरल
आरोपीने अल्पवयीन मुलीस पळवून नेत एका ठिकाणी लग्न केले. त्यानंतर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते.