सॅनिटायजर प्राशन करून विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:25 AM2021-05-28T04:25:26+5:302021-05-28T04:25:26+5:30

बीड : कार घेण्यासाठी माहेरून अडीच लाख रुपये घेऊन येण्यासाठी सासरच्यांनी विवाहितेचा अतोनात छळ केला. सततच्या छळाला त्रासलेल्या विवाहितेने ...

Married woman commits suicide by administering sanitizer | सॅनिटायजर प्राशन करून विवाहितेची आत्महत्या

सॅनिटायजर प्राशन करून विवाहितेची आत्महत्या

Next

बीड : कार घेण्यासाठी माहेरून अडीच लाख रुपये घेऊन येण्यासाठी सासरच्यांनी विवाहितेचा अतोनात छळ केला. सततच्या छळाला त्रासलेल्या विवाहितेने सॅनिटायजर प्राशन करून आत्महत्या केली. मात्र, विवाहितेने विषारी द्रव प्राशन केल्याचे उघड होऊ नये यासाठी शवविच्छेदन टाळण्यासाठी सासरच्यांनी चक्क तिचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा बोगस रिपोर्ट बनवला. परंतु, माहेरच्या लोकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा प्रयत्न फसला आणि शवविच्छेदन पार पडले. याप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांवर पाटोदा पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

पूजा गणेश रायकर (वय २१, रा. धनगर जवळका, ता. पाटोदा) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पूजाचे माहेर अंबाजोगाईचे आहे. तिचे वडील बिभीषण महादेव शेवाळे यांच्या फिर्यादीनुसार पूजाचा विवाह दोन वर्षांपूर्वी गणेश शिवाजी रायकर याच्यासोबत झाला होता. गणेश पुण्यात एका खासगी वाहतूक कंपनीत कामाला आहे. लग्नानंतर सुरुवातीचे दीड वर्ष चांगले गेले. त्यानंतर तुला अजूनही मूलबाळ होत नाही, असे पती गणेश, सासरा शिवाजी अर्जुन रायकर आणि सासू विजूबाई हे सतत तिला म्हणू लागले. कार घेण्यासाठी माहेरहून अडीच लाख रुपये घेऊन ये, असा तगादा तिच्यामागे लावला. सहा महिन्यांपूर्वी पूजाच्या आई-वडिलांनी आर्थिक परिस्थिती बिकट असून, आणखी एका मुलीचे लग्न करायचे बाकी आहे, पैसे आल्यास आम्ही तुम्हाला गाडीसाठी पैसे देऊ, असे पूजाच्या सासरच्यांना सांगितले. एप्रिल महिन्यात लॉकडाऊनमुळे गणेश पूजासह गावी धनगरजवळका येथे परतला. तिथे आल्यावर त्याने आई-वडिलांच्या मदतीने कारच्या पैशासाठी पूजाला सतत मारहाण, शिवीगाळ करून छळ सुरू केला, तिला उपाशी ठेवू लागले. सततचा छळ असह्य झाल्याने पूजाने १९ मे रोजी दुपारी ३ वाजता वडिलांना शेवटचा कॉल केला आणि त्यानंतर तिने सॅनिटायजर प्राशन केले. तिला अत्यवस्थ अवस्थेत अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर २५ मे रोजी रात्री ८ वाजता गणेशचा मावस भाऊ नामदेव हरिभाऊ सुडके हा रुग्णवाहिका घेऊन तिथे आला. पुण्यात माझी लॅब असल्याने खासगी रुग्णालयात माझे संबंध आहेत, उपचार चांगले होती असे म्हणत त्याने पूजाला नेऊन पुण्यातील रुग्णालयात दाखल केले. तिथे २६ मे रोजी पहाटे ४ वाजता पूजाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

कोरोना पॉझिटिव्हचा बनवला बोगस रिपोर्ट

दरम्यान, पूजाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यास विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे उघड होईल हे चाणाक्ष नामदेवच्या लक्षात आले. नियमानुसार कोरोना रुग्णांचे शवविच्छेदन करत नाहीत. त्यामुळे शवविच्छेदन टाळण्यासाठी नामदेवने स्वतःच्या लॅबमध्ये पूजाची कोरोना चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह असल्याचा खोटा लेखी अहवाल रुग्णालयाला सादर केला. परंतु, पूजाच्या माहेरच्या लोकांना हा अहवाल मान्य नसल्याने त्यांनी दुसरीकडे पूजाची कोरोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. त्यानंतर पूजाचा मृतदेह नातेवाइकांना मिळाला आणि तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चौघांवर गुन्हा; अटकेतील दोघांना न्यायालयीन कोठडी

पूजाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून तिचा पती गणेश, सासरा शिवाजी, सासू विजूबाई आणि मावस भाऊ नामदेव सुकडे यांच्यावर पाटोदा पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी छळ आणि आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी पती आणि सासऱ्यास ताब्यात घेतले आहे. त्या दोघांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तर सासू आणि कोरोना चाचणीचा बोगस अहवाल आणून देणारा मावस भाऊ फरार आहेत. पुढील तपास पीएसआय पठाण करत आहेत.

Web Title: Married woman commits suicide by administering sanitizer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.