लग्नानंतर महिनाभरातच विवाहितेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:35 AM2021-04-20T04:35:31+5:302021-04-20T04:35:31+5:30
परळी : शहरातील पेठ मोहल्ला भागात एका विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सासरच्या मंडळीविरुद्ध येथील शहर पोलीस ठाण्यात ...
परळी : शहरातील पेठ मोहल्ला भागात एका विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सासरच्या मंडळीविरुद्ध येथील शहर पोलीस ठाण्यात हुंडाबळीच्या उद्देशाने मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी ही घटना घडली असून, याप्रकरणी मयत विवाहितेच्या पतीला अटक करण्यात आली आहे.
तालुक्यातील सिरसाळा येथील सलीम पाशामियाँ मणियार यांची मुलगी सुमय्या हिचा विवाह १४ मार्च २०२१ रोजी परळी येथील पेठ मोहल्ला येथील सद्दाम शेख याच्यासोबत झाला होता; परंतु लग्न झाल्यानंतर पंधरा दिवसांनंतर त्यांची मुलगी सुमय्या ही माहेरी सिरसाळा येथे आली. सासरचे लोक पैशासाठी त्रास देत असल्याचे तिने सांगितले होते. ‘तुझ्या वडिलांकडून बांगड्यांचा व्यापार करण्यासाठी तीन लाख रुपये घेऊन ये,’ असे म्हणत मारहाण करून छळ करत असल्याचे तिने सांगितले होते. त्यामुळे एक महिन्यात पैसे देऊ, असे सांगून सलीम यांनी मुलीची समजूत घातली व सासरी परळी येथे पाठवून दिले. दरम्यान, शनिवारी सुमय्या हिचा मृत्यू झाला. मुलीचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर माहेरच्या लोकांनी परळीत धाव घेतली.
व्यापार करण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी सासरच्या लोकांकडून सुमय्याचा मानसिक व शारीरिक छळ होत होता. त्यामुळे हा मृत्यू नसून खून असल्याची फिर्याद सलीम पाशामियाँ मणियार यांनी शहर ठाण्यात दिली. हुंड्याच्या हेतूने विवाहितेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी फिर्यादी सलीम पाशामियाँ मणियार (रा. सिरसाळा) यांच्या फिर्यादीवरून आरोपी पती सद्दाम शेख शेख खैसर, सासू परवीन शेख, सासरे खैसर शेख, नणंद समरीन शेख, दीर अमेर शेख, इम्रान शेख खैसर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक एकशिंगे करीत आहेत.
व्हिसेरा राखून ठेवला
मयत सुमय्या हिचा व्हिसेरा आणि हिस्टोपॅथी राखीव ठेवण्यात आला आहे. अहवालानंतर पुढील कार्यवाही होणार असून, अटक केलेल्या आरोपी पतीला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.