मंगल कार्यालये, कोचिंग क्लासेस चालकांना सूचना अन् तंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:23 AM2021-02-19T04:23:00+5:302021-02-19T04:23:00+5:30
बीड : शहरात कोरोनाच्या अनुषंगाने बीड पालिकेने कडक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी आदेश निघताच गुरुवारी सकाळीच बीड ...
बीड : शहरात कोरोनाच्या अनुषंगाने बीड पालिकेने कडक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी आदेश निघताच गुरुवारी सकाळीच बीड पालिकेने सर्व मंगल कार्यालये आणि कोचिंग क्लासेसची तपासणी करून सूचनावजा तंबी दिली. यासाठी शहरात सहा पथकांची नियुक्ती केली आहे.
शहरात जवळपास ५० मंगल कार्यालये आणि १५० पेक्षा जास्त छोटे-मोठे कोचिंग क्लासेस आहेत. या सर्वांच्या भेटी घेऊन त्यांना कोरोना नियमांचे पालन करण्यासंदर्भात बीड पालकेकडून सांगितले जात आहे. एका बाकड्यावर एकच विद्यार्थी बसवून अध्यापन करा. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स अशा कोरोना नियमांचे पालन करण्यासह विद्यार्थ्यांनाही याबाबत आवाहन करण्याच्या सूचना पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांनी क्लासेस चालकांना दिल्या. तसेच मंगल कार्यालय चालकांनाही भेटी घेऊन कोरोनाच्या नियमांची अंमलबजावणी करण्यास सांगितले. गुरुवारी दिवसभरात केवळ एकाही व्यक्तीवर कारवाई झाली नाही; परंतु या सर्व नियमांची अंमलबजावणी होते की नाही, याची तपासणी करण्यासाठी सहा स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यांना परिसर विभागून देण्यात आलेले आहेत. आता याची किती तपासणी होते आणि किती पालन केले जाते, हे वेळच ठरविणार आहे.
कोट
कोरोना नियमांचे पालन करण्यासंदर्भात कोचिंग क्लासेस, मंगल कार्यालय चालकांना सूचना केल्या आहेत. ते कोरोना नियमांचे पालन करतात की नाही, हे तपासणीसाठी सहा स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. पहिल्यावेळी नोटसी आणि दुसऱ्यावेळी थेट गुन्हा दाखल केला जाईल.
डॉ. उत्कर्ष गुट्टे
मुख्याधिकारी, नगर परिषद, बीड