शहीद जवान उमेश मिसाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 07:02 PM2023-06-28T19:02:50+5:302023-06-28T19:03:32+5:30
फुलांनी सजविलेल्या ट्रकमध्ये तिरंग्यात आच्छादलेल्या उमेश मिसाळ यांच्या पार्थिवाची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली.
- मधुकर सिरसट
केज : तालुक्यातील चे सुपुत्र शहीद जवान उमेश नरसू मिसाळ यांच्यावर आज सकाळी कोल्हेवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करून अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी शहीद जवान, अमर रहेच्या जयाघोष करण्यात आला. भारतीय सैन्य दलात कार्यरत जवान उमेश हे सोमवारी सकाळी राजस्थानमधील सुरतगड येथे सेवा बजावताना शहीद झाले होते. भूमिगत विज वाहिनीचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाला होता.
भारतीय सैन्य दलात 25 मराठा लाईट इन्फन्ट्री बटालियनमध्ये सुरतगढ येथे कोल्हेवाडी गावचे सुपुत्र उमेश नरसु मिसाळ (23 वर्षे ) हे देशसेवेत कार्यरत होते. सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान ते परेडसाठी जाण्याच्या तयारीत असताना भूमिगत विजवाहिनीचा शॉक लागून त्यांचे अपघाती निधन झाले होते. दरम्यान, सुभेदार सुधाकर कुटाळ व त्यांचे सहकारी शहीद उमेश मिसाळचे पार्थिव घेऊन मंगळवारी रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान दिल्ली येथून विमानाने पुणे येथे पोहोचले. त्यानंतर आज सकाळी साडे आठ वाजेच्या दरम्यान पार्थिव कोल्हेवाडी येथे पोहोचले.
फुलांनी सजविलेल्या ट्रकमध्ये तिरंग्यात आच्छादलेल्या उमेश मिसाळ यांच्या पार्थिवाची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी 'उमेश मिसाळ अमर रहे, भारत माता की जय' च्या घोषणा देण्यात आल्या. अंत्ययात्रेच्या मार्गावर रांगोळी काढून फुलांचा सडा टाकलेला होता. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी उभे राहून फुलांची उधळण करत अंतिम दर्शन घेतले.
यावेळी खासदार प्रीतम मुंडे, अक्षय मुंदडा, तहसीलदार एम. जी. खंडागळे, गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, जिल्हा सैनिक बोर्डाचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सुशीला मोराळे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर शिंदे, 25 मराठा इन्फन्ट्रीचे सुभेदार सुधाकर कुटाळ, भाजपचे केज तालुकाध्यक्ष भगवानराव केदार, माजी संघर्ष सैनिक संघटनेचे सचिव प्रा. हनुमंत भोसले, मेजर अजिमोद्दीन इनामदार पत्रकार, महसूल कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी आदरांजली वाहिली.
हवेत फैरी झाडून मानवंदना...
बीड पोलीस दलाच्यावतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर वडील नरसू मिसाळ यांनी चितेला भंडाग्नी दिला. यावेळी उपस्थितांनी अश्रूंना वाट मोकळी केली .
सुटी झाली होती मंजूर
उमेश मिसाळ आणि प्रतीक्षा केकाण यांचा विवाह 29 ऑगस्ट 2022 रोजी झाला होता. उमेश यांनी पत्नी प्रतिक्षाला भ्रमणध्वनीवरून गावाकडे येण्यासाठी रजा मंजूर झाल्याची माहिती दुर्घटनेपूर्वीच कळविली होती. त्यामुळे पत्नीसह सर्व कुटुंबीय आनंदात होते. दरम्यान, उमेश यांचे निधन झाल्याची वार्ता धडकल्याने आनंद दुःखात बदलून गेला. अवघ्या दहा महिन्यातच पतीच्या निधनामुळे पत्नी प्रतीक्षावर आकाश कोसळले आहे. आई व पत्नीने फोडलेला हंबरडा उपस्थित्यांची मन हेलावून गेले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील व दोन भाऊ असा परिवार आहे.