मास्कने लिपस्टीकची लाली घालवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:31 AM2021-05-01T04:31:49+5:302021-05-01T04:31:49+5:30
बीड : कोरोना लॉकडाऊन व निर्बंधाचा फटका इतर व्यावसायिक बरोबरच ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलांनाही बसला आहे. तसेच ...
बीड : कोरोना लॉकडाऊन व निर्बंधाचा फटका इतर व्यावसायिक बरोबरच ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलांनाही बसला आहे. तसेच सौंदर्य प्रसाधनांच्या बाजारपेठेला आर्थिक नुकसान सहन करण्याची वेळ आली आहे. बीड शहरात जवळपास २०० तर जिल्ह्यात ४०० च्या आसपास ब्युटी पार्लर आहेत. या आधारे अनेक महिला आपल्या सौंदर्य प्रसाधनातील कौशल्य आधारे ब्युटी पार्लरची सेवा देत कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. परंतु एक वर्षापासून या व्यवसायाला कोरोनाची दृष्ट लागली तर मेकअपची हौस करून टापटीप राहणाऱ्या महिलांना घरात रहावे लागत असल्याने सौंदर्य प्रसाधनांच्या विक्रीवर ही परिणाम झाला आहे
ब्युटी पार्लर चालकांना मास्क, ग्लोव्हज, हेअर कॅप व कोरोनाचे नियम पाळून सेवा देण्याचे बंधन आहे. मात्र या संसर्गाच्या भीतीपोटी आणि ग्राहकांना घरातच रहावे लागत असल्याने ब्युटीपार्लरच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. मागील वर्षी मार्चपासून कोराेना पसरू लागल्यानंतर कडक निर्बंध लावण्यात आले. लग्न व इतर कार्यक्रमांच्या अनुषंगाने ॲडव्हान्स बुकिंग केलेल्या ग्राहकांनी ऑर्डर रद्द करून अनामतीची रक्कम परत मागितली. दिवाळी ते फेब्रुवारीपर्यंत काही प्रमाणात सवलत मिळाली तरी बंधने कायम होती. लग्नातील उपस्थितीची मर्यादा तसेच इतर कार्यक्रमही साधेपणाने होऊ लागल्याने ब्युटी पार्लरची सेवा घेण्याचे अनेक महिलांनी टाळले. कोरोनामुळे मास्क वापर आवश्यक बनले आहे. मग लिपस्टिक लावून किंवा मेकअप करून त्याचा काय उपयोग हाेणार म्हणून महिलांनी ते टाळले. त्यामुळे मास्कने देखील लिपस्टीकची लाली घालवली आहे. ---
सौंदर्य प्रसाधनांना ठराविक मुदत असते. मर्यादित काळात वापर झाला तर त्याचा उपयोग होतो. सौंदर्य प्रसाधनांना हवा लागली नाही तर नुकसान होते. मागील लॉकडाऊनमध्ये मोठा फटका बसला. एक्सपायरी सौंदर्यप्रसाधने रिप्लेसमेंट नसल्याने नष्ट करावी लागली. लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील व्यावसायिकांना जवळपास दोन ते तीन कोटी रूपयांचा फटका बसला आहे.
सविता गिरीश पाथरीकर जैन, कॉस्मेटिक विक्रेता.
----------
ब्युटी पार्लरच्या व्यवसायात आम्ही खूप गुंतवणूक केली, मात्र कोरोना लॉकडाऊनमुळे मोठे नुकसान झाले आहे. सध्या ग्राहकांचा प्रतिसाद नसल्यातच जमा आहे. ब्युटी पार्लर व्यवसायावर अनेकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. नियम पाळून सेवा देण्याचे बंधन असलेतरी अनेकांनी दिलेल्या ऑर्डर रद्द केल्या तर दहा लग्नांपैकी दोन नवरींनीच मेकअप पसंत केला. हौशी ग्राहकांनीही पाठ फिरवली आहे.- ग्रिष्मा राठौर, ब्युटी पार्लर चालक
----
कोरोनामुळे ब्युटी पार्लरचा व्यवसाय ९९ टक्के कोसळला आहे. संरक्षणाच्या दृष्टीने कोरोनाचे नियम पाळून सेवा देण्यास तयार असलो तरी महिला ग्राहक घरातच असल्याने प्रतिसाद नाही. लग्नसोहळ्यावर उपस्थितीची बंधने आहेत. त्यामुळे दहा लग्नात एखादी नवरी हौसेपायी मेकअप करते. मात्र घरातील इतर महिला मेकअप टाळत आहेत. - जयश्री वखरे, ब्युटी पार्लर चालक
---------
सार्वजनिक सोहळे नाहीत. कुठे जायचेच नाही. मग मेकअपची काय गरज? पाहणारच कोणी नाही तर नटायचे कशाला? कोरोनामुळे महिलांच्या हौसेवर परिणाम झाला आहे. घरातच राहावे लागत असल्याने पावडर शिवाय इतर सौंदर्यप्रसाधने वापरावी लागत नाहीत. बाहेर जायचे तर मास्क वापरायचे मग लिपस्टिक तरी का लावायची? - रंजना छाजेड, बीड
----
लॉकडाऊनमुळे लग्न, वाढदिवस, सण-उत्सव साधेपणाने साजरे होत आहेत. सार्वजनिक सोहळे बंद आहेत. त्यामुळे उत्साहाने खर्च करणाऱ्या महिला वर्गाने सध्या विचार बदललेला आहे. २४ तास घरातच राहायचे तर ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची काय गरज असा त्यांचा विचार बनला आहे. - करूणा नगरकर, बीड.