जमिनीच्या वादातून दुहेरी हत्याकांडात चौघांना जन्मठेप, ९ वर्षांनंतर लागला निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 05:01 PM2021-11-24T17:01:10+5:302021-11-24T17:02:36+5:30

११ आरोपींमध्ये अनोळखी पाच महिलांचा उल्लेख होता; परंतु सबळ पुराव्याअभावी पाचही महिलांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

Massacre over land dispute; Four sentenced to life in prison for double murder | जमिनीच्या वादातून दुहेरी हत्याकांडात चौघांना जन्मठेप, ९ वर्षांनंतर लागला निकाल

जमिनीच्या वादातून दुहेरी हत्याकांडात चौघांना जन्मठेप, ९ वर्षांनंतर लागला निकाल

Next

अंबाजोगाई : तालुक्यातील तडोळा शिवारात जमिनीच्या वादातून शेतकऱ्यासह साक्षीदाराचा कोयत्याने खून केल्याप्रकरणी चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा, तर साक्षीदाराला जखमी केल्याप्रकरणी इतर दोघांना दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा अतिरिक्त जिल्हा न्या. एम. बी. पटवारी यांनी २३ नोव्हेंबर रोजी सुनावली.

वसंत मुकुंदराव कराड (रा. वांगदरी, ता. रेणापूर, जि. लातूर) यांची तडोळा शिवारात गट क्र.१४७ व १४८ मध्ये शेती आहे. तेथे त्यांनी ऊसलागवड केलेली होती. १६ एप्रिल २०१२ रोजी कराड यांच्या शेतातील ऊस तोडून घेऊन जाताना शेजाऱ्यांशी वाद झाला. यावेळी आरोपींनी कोयता व कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यात, पाठीवर गंभीर जखमा केल्या व साक्षीदार गणेश गंभिरे, तत्कालीन सरपंच बबन कराड यांनासुद्धा मारहाण केली. या हल्ल्यात वसंत मुकुंदराव कराड, लक्ष्मण गंभिरे, गणेश गंभिरे, बबन कराड हे गंभीररीत्या जखमी झाले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वसंत मुकुंदराज कराड यांना डॉक्टरांनी घोषित केले, तर उपचारादरम्यान लक्ष्मण नरहरी गंभिरे यांचा मृत्यू झाला. गणेश सुदाम गंभिरे यांच्या फिर्यादीवरून बर्दापूर ठाण्यात तडोळा येथील ११ आरोपींविरोधात कलम ३०२, ३०७, ३२६, ३२४ भादंविसह गुन्हा दाखल करण्यात आला होता. बर्दापूर पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र अंबाजोगाईच्या अतिरिक्त जिल्हा न्यायालयात दाखल केले. उत्तरीय तपासणी अहवाल व सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा न्या. एम. बी. पटवारी यांनी मदन ग्यानदेव पुजारी व महादेव ग्यानदेव पुजारी यांना वसंत कराड यांच्या खुनाबद्दल दोषी धरून जन्मठेप व दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच हल्लाकरतेवेळी भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या लक्ष्मण नरहरी गंभिरे यांच्या खून प्रकरणात बळीराम ग्यानदेव पुजारी व अंकुश ग्यानदेव पुजारी यांनादेखील जन्मठेप व दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला, तर घटनास्थळावरील साक्षीदाराला मारहाण केल्याबद्दल अरुण ग्यानदेव पुजारी, राजकुमार ग्यानदेव पुजारी यांना कलम ३२४ प्रमाणे एक वर्ष, तर कलम ३२६ प्रमाणे दोन वर्षांची सक्तमजुरी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे ॲड. लक्ष्मण फड यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. अनंत तिडके यांनी सहकार्य केले. पो.हे.कॉ. गोविंद कदम व बी. एस. सोडगीर यांनी पैरवी म्हणून काम केले. घटनेच्या ९ वर्षानंतर मारेकऱ्यांना शिक्षा झाल्याने मयतांच्या नातेवाइकांनी समाधान व्यक्त केले.

पाच महिलांची निर्दोष मुक्तता
दुहेरी खून प्रकरणात सहा आरोपींनी दोघांचा खून व दोघांना जखमी केल्यामुळे सहा आरोपीविरुद्ध आरोपी सिद्ध झाल्यामुळे त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली. फिर्यादीत ११ आरोपींमध्ये अनोळखी पाच महिलांचा उल्लेख होता; परंतु सबळ पुराव्याअभावी पाचही महिलांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

व्हीसीद्वारेच सुनावला निकाल
अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एम. बी. पटवारी यांनी या प्रकरणाची मंगळवारी सुनावणी ठेवली होती. बीडच्या कारागृहात असलेल्या चौघा आरोपींना व्हीसीवर घेत सुनावणी झाली. यात सहा जणांना दोषी ठरविण्यात आले. या निकालाकडे अंबाजोगाई तालुक्याचे लक्ष लागले होते. काही साक्षीदार फितूर झाले असले तरी सरकार पक्षाचा युक्तिवाद व जखमींचा जबाब ग्राह्य धरूनच ही शिक्षा सुनावली गेली.

Web Title: Massacre over land dispute; Four sentenced to life in prison for double murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.