बीड जिल्ह्यात आजाराची भीती दाखवून गर्भाशय काढण्याचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 06:53 PM2019-04-12T18:53:13+5:302019-04-12T18:56:38+5:30

१० रूग्णालयांत काढल्या १५०० गर्भाशय पिशव्या 

massive cervical surgery by showing fear of illness in Beed district | बीड जिल्ह्यात आजाराची भीती दाखवून गर्भाशय काढण्याचा बाजार

बीड जिल्ह्यात आजाराची भीती दाखवून गर्भाशय काढण्याचा बाजार

Next

बीड : जिल्ह्यात महिलांना विविध आजारांची भीती दाखवून गर्भ पिशव्या काढून टाकण्याचा बाजार मांडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोग्य विभागाच्या समितीने याची चौकशी केली असता जिल्ह्यातील १० रुग्णालयांमध्ये दीड हजारापेक्षा जास्त शस्त्रक्रिया झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात २०० च्या जवळपास स्त्री रूग्णालये असल्याचे सांगण्यात आल्याने तीन वर्षांतील आकडा फुगण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गरज नसतानाही जिल्ह्यात कमी वयाच्या महिलांची गर्भ पिशवी काढून टाकण्यात येत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. राज्याच्या आरोग्य विभागालाही चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांना आदेश देत तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले. त्याप्रमाणे डॉ.आय.व्ही.शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली  डॉ. संतोष शहाणे, डॉ. अशोक हुबेकर, डॉ. महेश माने व लिपीक विकास शिंदे ही पाच सदस्यीय समिती नियूक्त केली आहे.

दरम्यान, बुधवारीच जिल्ह्यातील सर्व रूग्णालयांना पत्र पाठवून केलेल्या शस्त्रक्रियांचा अहवाल डॉ.थोरात यांनी मागविला. गुरूवारी या समितीने यावर अभ्यास करून ‘टॉप १०’ रूग्णालये काढली. या रूग्णालयांची सायंकाळच्या सुमारास चौकशी सुरू करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. रात्री ७ वाजेच्या सुमारास डॉ.थोरात, डॉ.शिंदे यांची टिम सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स परिसरातील एका रूग्णालयात उशिरापर्यंत ठाण मांडून होते. त्यांच्या हाती काय लागले? हे मात्र समजू शकले नाही.

जिल्हाधिकारी, आरोग्य विभागाची बैठक
जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी आरोग्य विभागाची बैठक बोलावली आहे. यात आरोग्य विभागाचे सहसंचालक कार्यालयाचे अधिकारी उपस्थित राहतील. या शिवाय, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्ह्यातील तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षकही उपस्थित राहणार आहेत.  

चौकशी सुरु आहे 
जिल्ह्यातील सर्वच रूग्णालयांकडून अहवाल मागविला आहे. याच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती नियूक्त केली आहे. सुरूवातीला प्राप्त अहवालातातून १० रूग्णालयांची चौकशी केली जात आहे. त्यानंतर स्पॉट व्हिजीट देऊन चौकशी होईल. यासाठी वेळ लागणार असला तरी जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही.
-डॉ.अशोक थोरात, जिल्हा  शल्य चिकित्सक, बीड

Web Title: massive cervical surgery by showing fear of illness in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.