बीड येथील पहिल्या वृक्षसंमेलनात भरगच्च कार्यक्रमांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 03:39 PM2020-02-11T15:39:46+5:302020-02-11T15:47:01+5:30
वृक्षांच्या सान्निध्यात जगातील पहिले वृक्ष संमेलन १३ व १४ फेबु्रवारी रोजी होत आहे.
बीड : पालवनजवळील उजाड डोंगररांगावर सह्याद्री देवराई प्रकल्प राबवण्यात आला आहे. याठिकाणी १ लाख ६७ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या वृक्षांच्या सान्निध्यात जगातील पहिले वृक्ष संमेलन १३ व १४ फेबु्रवारी रोजी होत आहे. या संमेलनास पर्यावरण आणि निसर्गप्रेमी असलेल्या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन सिने अभिनेते सयाजी शिंदे, लेखक अरविंद जगताप व वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
संमेलनातून पर्यावरण, वृक्ष लागवड जनजागृती केली जाणार असल्याचे सयाजी शिंदे यांनी पत्रपरिषदेत सांगितले. सह्याद्री देवराई व बीड वनविभागातर्फे होत असलेल्या जगातील पहिल्या वृक्ष संमेलनात मान्यवरांचे व्याख्याने होणार आहेत. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:३० वा. श्रीकांत इंगनहलीकर यांचे ‘दुर्मिळ वनस्पती’ या विषयावर तर १२.०५ वा. सी.बी. साळुंके हे ‘गवताळ परिसंस्था’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. १२.०५ वा. बसवंत दुमने यांचे ‘पर्यावरण खेळ’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारी १.०१५ वा. नंदु तांबे हे ‘पक्षी झाडे सहसबंध’ या विषयावर विचार व्यक्त करणार आहेत. १:५० वा. दिनकर चौगुले हे ‘देवराई यशोगाथा’ या विषयावर बोलणार असून २:१५ वा. महेंद्र चौधरी ‘सुगंधी वनस्पतीची लागवड व तेल निर्मिती’ या विषयावर बोलणार आहे. दुपारी ३ वाजता पांडूरंग शितोळे हे शेंद्रीय शेती या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तर ३:३५ वाजता शेखर गायकवाड हे ‘झाडे लागवड व देवराई निर्मिती यशोगाथा’ यावर बोलणार आहेत. सायंकाळी ४:१० वा. पोपट रसाळ हे ‘वृक्ष बँकेची संकल्पना’ मांडणार आहेत.
१४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता संजय नरवटे हे ‘पीक व झाडांवरील रोग- किड व्यवस्थापन’ या विषयावर बोलणार आहेत. ११: ०५ वाजता जयसिंग पवार हे पाणी व्यवस्थापन या विषयावर विचार व्यक्त करणार आहेत. यानंतर सुहास वार्इंगनकर हे ‘दुर्मिळ फुपाखरू’ या विषवर मार्गदर्शन करणार आहेत. २ वा.रघुनाथ ढोले हे ‘रोपवाटिका’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. संमेलनास विद्यार्थी व निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सुनंदाताई पवार यांचे व्याख्यान
वृक्ष संमेलनात १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.५ वाजता आ. रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार या वृक्ष संमेलनात महिलांचा सहभाग या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत.