मातंग आरक्षण : ५० तासानंतर संजयवर अंत्यसंस्कार; पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 07:56 PM2019-03-07T19:56:18+5:302019-03-07T19:57:10+5:30
सकारात्मक विचार करण्याबद्दल लेखी आश्वासन देताच आंदोलन मागे घेण्यात आले.
केज (बीड ) : मातंग समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी संजय ताकतोडे (रा.साळेगाव ता.केज) या तरूणाने जलसमाधी घेतली होती. त्यानंतर नातेवाईकांनी मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू केले. अखेर पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी मदत जाहीर करून मागण्याबाबत सकारात्मक विचार करण्याबद्दल लेखी आश्वासन देताच आंदोलन मागे घेण्यात आले. तब्बल ५० तासानंतर संजयच्या पार्थिवावर पोलीस बंदोबस्तात गुरूवारी दुपारी अंत्यसंस्कार झाले.
केज तालुक्यातील साळेगाव येथील संजय ताकतोडे याने मातंग समाजास एससी प्रवर्गातील १३ टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी पाली येथील बिंदुसरा धरणात जलसमाधी घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली होती. त्यानंतर त्याचे शवविच्छेदन इन कॅमेरा करावे, अशी मागणी नातेवाईकांनी केली. त्यासाठी संजयचा मृतदेह औरंगाबादच्या घाटी रूग्णालयात नेला. शवविच्छेदन झाल्यानंतरही नातेवाईकांनी अचानक औरंगाबादमध्ये ठिय्या आंदोलन केले. पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेत शव बुधवारी रात्री साळेगाव येथे आणण्यात आले. यावेळे संजयच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे, कुटुंबाला पंचवीस लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नौकरीस घ्यावे, मुंबई विद्यापीठास अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे यासारख्या विविध मागण्यांसाठी साळेगावमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले.
मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यात अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. त्यानंतर बुधवारी रात्री आ. प्रा.संगीता ठोंबरे यांनी मध्यस्थी करून पालकमंत्री पंकजा मुंडे यांना या बाबतीत माहिती दिली. तरीही आंदोलक शांत झाले नाहीत. जोपर्यंत पालकमंत्री साळेगाव येथे येऊन लेखी आश्वासन देत नाहीत, तो पर्यंत अंत्यसंस्कार न करण्याच्या निर्णयावर ते ठाम होते.
गुरूवारी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी संजयच्या कुटुंबास लेखी पत्र देत शासकीय मदतनिधीतुन दहा लाख रुपये व गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने दोन लाख रुपयाची आर्थिक मदत जाहिर केली. तसेच इतर मागण्यासंदर्भात आपण स्वता: लक्ष घालुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या बाबतीत लवकरच बैठक लावणार असल्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच जिल्हाधिकारी यांनीही शासकीय मदतनिधीतुन दहा लक्ष रुपये मदत जाहिर केल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर गुरुवारी सायंकाळी पाच वाजता ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी प्रा.संगीता ठोंबरे, समाजकल्याण सभापती संतोष हांगे, प्रा. लक्ष्मण ढोबळे, रमेश आडसकर, राजकिशोर मोदी, लहुजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष खंदारे, गौतम बचुटे, अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, पोलीस उपअधीक्षक अशोक आम्ले, उपविभागीय अधिकारी शोभादेवी जाधव, नायब तहसीलदार सचिन देशपांडे, पोलीस निरीक्षक सुनिल बिर्ला आदींची उपस्थिती होती.
साळेगावात कडकडीत बंद
संजय ताकतोडे यांनी जलसमाधी घेऊन आत्महत्या केल्यानंतर लहुजी सेनेच्या वतीने विविध मागण्यासंदर्भात ठिय्या आंदोलन करत अंत्यविधी करण्यास नकार दिल्याने साळेगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. गुरुवारी साळेगाव येथील आठवडी बाजार असतानाही बाजार तळावर शुकशुकाट दिसुन आला. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून प्रशासनाने साळेगावसह आ.ठोंबरे यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
शेळी पालनासाठी ५० हजार रूपये
संजयच्या कुटूंबाला शेळी पालनासाठी समाजकल्याण विभागाकडून ५० हजार रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. सभापती संतोष हंगे यांनी ही घोषणा केली.