अन्याय अत्याचाराविरुद्ध मातंग समाजाचा ‘बहिष्कार मोर्चा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 12:11 AM2019-08-02T00:11:03+5:302019-08-02T00:11:52+5:30
अण्णाभाऊ साठे जयंती राज्यभरात उत्साहात साजरी होत असताना, बीड शहरात मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी पिपल्स डेमोक्रॅटीक पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बहिष्कार मोर्चा काढण्यात आला.
बीड : अण्णाभाऊ साठे जयंती राज्यभरात उत्साहात साजरी होत असताना, बीड शहरात मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी पिपल्स डेमोक्रॅटीक पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बहिष्कार मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारोच्या संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ््यास अभिवादन करुन या बहिष्कार मोर्चाची सुरुवात झाली, सुभाष रोड मार्गे शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ््यास हार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला, यावेळी मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चाचे नेतृत्व पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे हे करत होते. यावेळी ते म्हणाले, गुलामाला गुलामीची जाणिव करुन दिली पाहिजे तरच तो समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील, राज्यातील अनेक गावांमध्ये विविध कारणांवरुन समाजावर अन्याय होत आहे. याकडे शासनाने लक्ष द्यावे अन्यथा मोठ्या संख्येने मुंबई येथील विधीमंडळावर मातंग समाजाचा मोर्चा काढला जाईल. पुढे बोलताना ते म्हणाले समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व महामंडळाचे कर्ज माफ करुन पुन्हा कर्जाचे वाटप करण्यात यावे, उद्योग व्यावसायला चालना देण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे, होणार अन्याय अत्याचाराला आळा घालण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी,यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी व महिला, पुरुष तसेच युवक मोर्चात सहभागी झाले होते.
हेच आमचे अभिवादन - अजिंक्य चांदणे
राज्यात अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे. मात्र, ते ज्या समाजातून आले त्या समाजावर विहिरीत पोहल्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे अन्याय अत्याचार होत असेल तर जयंती उत्सहात साजरी कशी करावी त्यामुळेच या बहिष्कार मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून हेच आमचे अभिवादन आहे, असे मत चांदणे यांनी यावेळी व्याक्त केले.