बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर मातृत्वाचे ओझे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 11:55 PM2018-02-21T23:55:03+5:302018-02-21T23:55:28+5:30

वय लहान असतानाही मुलींच्या खांद्यावर मातृत्वाचा भार पडत असल्याची धक्कादायक माहिती जिल्हा रुग्णालयातील सूत्रांकडून बुधवारी समजली. कमी वयात लग्न होणे किंवा कोणासोबत तरी संबंध आल्याने गरोदर राहणे यासारख्या प्रकारांमुळे अल्पवयीन मुलींना ‘मातृत्व’ येत आहे. शारीरिक व मानिसकदृष्ट्या सुदृढ नसताना ‘ती’ला ‘आई’ची भूमिका बजवावी लागत आहे. यातील अनेकांनी मुले ‘नकोशी’ झाल्याने त्यांना शिशूगृहात पाठविल्याचे सांगण्यात आले. वर्षाला अशा मुलांची संख्या ८ ते १० च्या जवळपास असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Maternal burden on minor girls in Beed district | बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर मातृत्वाचे ओझे

बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर मातृत्वाचे ओझे

googlenewsNext
ठळक मुद्देकाळजी न घेतल्यामुळे माता, बाळांच्या जीविताला धोका

सोमनाथ खताळ
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : वय लहान असतानाही मुलींच्या खांद्यावर मातृत्वाचा भार पडत असल्याची धक्कादायक माहिती जिल्हा रुग्णालयातील सूत्रांकडून बुधवारी समजली. कमी वयात लग्न होणे किंवा कोणासोबत तरी संबंध आल्याने गरोदर राहणे यासारख्या प्रकारांमुळे अल्पवयीन मुलींना ‘मातृत्व’ येत आहे. शारीरिक व मानिसकदृष्ट्या सुदृढ नसताना ‘ती’ला ‘आई’ची भूमिका बजवावी लागत आहे. यातील अनेकांनी मुले ‘नकोशी’ झाल्याने त्यांना शिशूगृहात पाठविल्याचे सांगण्यात आले. वर्षाला अशा मुलांची संख्या ८ ते १० च्या जवळपास असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कायद्यानुसार १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मुलीला लग्न करता येते. परंतु ग्रामीण भागात आजही याबाबत जनजागृती झालेली नाही. परिस्थिती आणि इतर कारणांमुळे १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच मुलींचे हात पिवळे केले जातात. त्यानंतर ‘ती’ गरोदर राहते. एवढ्या कमी वयात ‘तिला’ प्रसुतीला तोंड द्यावे लागते. सुदैवाने काही मुली आपल्या बाळाला सुखरूप जन्म देतात.

परंतु काही मुलींना मात्र खुप त्रास सहन करावा लागतो. शारिरिक वाढ झालेली नसल्याने तिला अनेक ‘कळा’ सहन कराव्या लागतात. यातून बाळाला आणि मातेला सुखरूप बाहेर काढण्याचे मोठे आव्हान डॉक्टरांसमोर असते. अनेकवेळा बाळ किंवा माता दगावण्याचीही दाट शक्यता असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

परिस्थितीचा गैरफायदा
साधारण तीन महिन्यांपूर्वीची एक घटना आहे. बीड शहर पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर तिच्या परिस्थितीचा फायदा घेत नराधमाने वारंवार अत्याचार केला. यातून ती गरोदर राहिली आणि बाळाला जन्म दिला. एवढ्या कमी वयात तिच्यावर मातृत्वाचे ओझे पडले होते. जिल्ह्यात अशाच घटना इतर ठिकाणीही घडल्याची अनेक उदाहरणे आहेत.

माता आणि बाळाला धोका
वय कमी असल्याने पूर्णपणे गर्भाशयाची वाढ झालेली नसते. तसेच अनेकवेळा गर्भाशयात बाळाचीही वाढ झालेली नसते. प्रसूतीदरम्यान, बाळाचे हृदयाचे ठोके कमी होण्याची भीती असते. मातेलाही कळा घेताना त्रास होतो. यामध्ये बाळ आणि मातेचा जीव धोक्यात असतो. परिस्थिती पाहून शस्त्रक्रिया करून बाळाला जन्म दिला जातो. ही सर्व प्रक्रिया डॉक्टरांसाठी आव्हानात्मक असते. यामध्ये बाळ आणि मातेच्या जिवाला धोका पोहचण्याची दाट शक्यता असते.

मातेला जडतात विविध आजार
मातेला उच्च रक्तदाबाचा विकार होऊ शकतो. तसेच प्रसुतीनंतर रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. यातुन मातेला विविध आजार जडतात. हे आजार नियंत्रणात आणताना डॉक्टरांना कसरत करावी लागते.

वर्धा येथे होते कुमारी मातांचे संगोपन
जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार कुमारी मातांसाठी वर्धा येथे महात्मा गांधी इन्स्टीट्यूट आॅफ मेडिकल सायन्स संस्था आहे. येथे या मातांचे संगोपन आणि समुपदेशन केले जाते. याठिकाणी त्यांची विशेष व्यवस्था केलेली आहे.

काळजी घेण्याची गरज
आपल्या मुलीचा विवाह १८ वर्षानंतरच करावा. तसेच मातृत्व येण्यापूर्वी आणि आल्यानंतर आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. वेळोवेळी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
मानसिकदृष्ट्या खचल्यावर समुपदेशक किंवा सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधून आधा घ्यावा. कायद्याने मदत हवी असल्यास पोलीस किंवा महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क करावा.


 

Web Title: Maternal burden on minor girls in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.