माताबाळ मृत्यू प्रकरण;पोलिसांचे १२ प्रश्न, समितीने डॉक्टर दाम्पत्य दोषी असल्याचा दिला निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 05:55 PM2022-05-18T17:55:40+5:302022-05-18T17:58:19+5:30
पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांसह इतर काय चुका झाल्या, याचा शोध घेण्यात आला. यात त्यांना डॉक्टरांचा निष्काळजीपणा झाल्याचे दिसले.
बीड : माजलगावातील सोनाली गायकवाड या मातेसह बाळाच्या मृत्यू प्रकरणात डॉक्टर जाजू दाम्पत्याचा निष्काळजीपणा झाला आहे का? याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र पाठवून १२ प्रश्न विचारले होते. यात चार वगळता सर्वच ठिकाणी नकारात्मक अहवाल गेला. त्यामुळेच या दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला. तसेच वेळीच स्त्रीरोग, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ उपलब्ध झाले असते तर मातेचा जीव वाचला असता, असा निष्कर्षही समितीने दिला आहे.
माजलगावातील घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी चौकशीसाठी समिती नियुक्त केली. यात रायमोहाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष शहाणे, पाटाेद्याचे डॉ. सदाशिव राऊत व माजलगावचे डॉ. सुभाष बडे यांचा समावेश होता. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांसह इतर काय चुका झाल्या, याचा शोध घेण्यात आला. यात त्यांना डॉक्टरांचा निष्काळजीपणा झाल्याचे दिसले. सोनाली यांना पहाटे चार वाजता झटका आला होता, तेव्हा प्रसूतीसाठी प्रगती झालेली नव्हती. हे पाहून लगेच तिचे सीझर अथवा पुढील संस्थेत पाठविणे आवश्यक होते. परंतु असे केले नाही. बाळाचे वजन साडेतीन केलो आहे हे माहिती असतानाही बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ यांना बोलावले नाही. प्रसूती गुंतागुंतीची झाल्याचे माहिती असतानाही तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावले नाही. या सर्वांमध्ये हलगर्जी झाल्यानेच मातेसह बाळाचा मृत्यू झाल्याचे समितीने अहवालात म्हटले आहे. त्यामुळे हे डॉक्टर दोषी असल्याचे सिद्ध झाले असून गुन्हा दाखल झाला.
स्त्रीराेगतज्ज्ञ डॉ. काकांनीही अडचणीत
याच रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ ऑन कॉल म्हणून डॉ. सुनंदा काकांनी या होत्या. त्यांनी महिलेला तपासून पुढे पाठविण्यासह शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला जाजू दाम्पत्याला दिल्याचा जबाब त्यांनी दिला आहे. वास्तविक पाहता दाम्पत्याची शस्त्रक्रिया करण्याइतपत पदवी झालेली नाही. तसेच स्वत: स्त्रीरोगतज्ज्ञ असतानाही आणि सर्व गुंतागुंत माहिती असतानाही दुसऱ्यांना सल्ला का दिला, स्वत:च शस्त्रक्रिया करून महिलेचा जीव का नाही वाचवला, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यांच्या या जबाबामुळे डॉ. काकांनी यादेखील अडचणीत सापडल्या आहेत.
दाम्पत्य अटकेत असल्याने बैठक पुढे
सोनालीच्या मृत्यूमधील गांभीर्य लक्षात घेता मंगळवारी दुपारी माता मृत्यू अन्वेषण समितीची बैठक बोलावली होती. परंतु डॉ. जाजू दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली असल्याने आणि ते समोर उपस्थित राहू शकत नसल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच सर्व माहिती घेतली. तसेच पाेलिसांनी आम्हाला १२ प्रश्न विचारले होते. त्याची उत्तरे देण्यासाठी तीन वैद्यकीय अधीक्षकांच्या समिती नियुक्त केली होती. चौकशी करूनच पोलिसांना अहवाल दिला. समितीच्या अहवालानुसार डॉ. जाजू दाम्पत्य हे दोषी असल्याचे सिद्ध होते. तसेच स्त्रीरोग, बालरोग व भूलतज्ज्ञ नसतानाही आणि प्रसूती गुंतागुंतीची झालेली आहे, हे माहिती असतानाही काहीच उपाययोजना न केल्याचे मतही समितीने नाेंदविले आहे.
डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड