रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसूती, बाळासह आई सुखरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 12:59 AM2019-07-08T00:59:27+5:302019-07-08T00:59:43+5:30

आपातकालीन वैद्यकीय सेवेच्या १०८ रूग्णवाहिकेतच अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागातील एका महिलेची सुखरूप प्रसूती झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.

Maternal mortality in the ambulance, mother with child's safety | रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसूती, बाळासह आई सुखरुप

रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसूती, बाळासह आई सुखरुप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : आपातकालीन वैद्यकीय सेवेच्या १०८ रूग्णवाहिकेतच अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागातील एका महिलेची सुखरूप प्रसूती झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. रुग्णवाहिकेतील डॉ.सचिन कस्तुरे यांनी कौशल्याने आणि काळजीपूर्वकरीत्या परिस्थिती हाताळत पहिल्या प्रसुतीवेळी सीझर झालेल्या या महिलेची नैसर्गिक प्रसूती करण्यात यश आले. सध्या बाळ व महिला सुखरूप असून त्यांच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गुरुवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अंबाजोगाई तालुक्यातील एका गावातून १०८ रुग्णवाहिकेसाठी कॉल करण्यात आला. हा कॉल १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. सचिन कस्तुरे यांनी घेतला. एका गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी अंबाजोगाई येथील शासकीय रूग्णालयात न्यायचे असल्याचे कॉलमध्ये सांगण्यात आले. डॉ. कस्तुरे आणि रुग्णवाहिका चालक अमर मुंडे यांनी तातडीने त्या गावाकडे धाव घेतली आणि गर्भवती महिला व तिच्या आईवडिलांना घेऊन ते स्वाराती रुग्णालयाकडे निघाले. परंतु, वाटेतच त्या गर्भवती महिलेला प्रसव वेदना सुरू झाल्या. त्यामुळे वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन डॉ. कस्तुरे यांनी त्या महिलेची प्रसूती घाटनांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्याचा सल्ला दिला. परंतु, या पूर्वीची प्रसूती सीझर पद्धतीने झालेली असल्याने त्या महिलेच्या मातापित्यांनी घाटनांदूर येथे प्रसूती करण्यास नकार देत अंबाजोगाईच्या शासकीय रूग्णालयात नेण्यास सांगितले. परंतु पूसपर्यंत त्या महिलेच्या वेदना वाढल्याने डॉ. कस्तुरे यांनी गाडीतच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. रात्री ८.४५ वाजता डॉ. कस्तुरे यांनी त्या महिलेची रुग्णवाहिकेतच यशस्वी नॉर्मल प्रसूती केली. बाळाच्या गळ्याभोवती नाळेचे तीन आडे पडले होते. डॉ.कस्तुरे यांनी कौशल्याने गळ्याभोवतालची नाळ काढली आणि बाळाला जीवदान दिले. बाळाचे वजन तीन किलो दोनशे ग्रॅम असून बाळ आणि त्याची आई दोघेही सुखरूप आहेत. त्यानंतर बाळ आणि त्याच्या आईला स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, डॉ. सचिन कस्तुरे यांनी प्रसंगावधान दाखवत केलेल्या यशस्वी प्रसूतीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याकामी डॉ. कस्तुरे यांना चालक अमर मुंडे यांचे सहकार्य लाभले. यामुळे जनतेचा १०८ रुग्णवाहिकेवरील विश्वास अधिक वाढला आहे.

Web Title: Maternal mortality in the ambulance, mother with child's safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.