मातंग आरक्षण : मागण्या मान्य झाल्याशिवाय संजयवर अंत्यविधी करणार नसल्याची नातेवाईकांची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 11:52 AM2019-03-07T11:52:44+5:302019-03-07T11:56:27+5:30
मागण्या मान्य होईपर्यंत अंत्यविधी केला जाणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने गावात तणावाची स्थिती आहे.
बीड : मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे, या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील बिंदुसरा तलावात उडी घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह बुधवारी रात्री उशिरा केज तालुक्यातील साळेगाव येथे आणण्यात आला. तरुणाच्या वारसांना २५ लाख रुपये नुकसानभरपाई आणि एका व्यक्तीला नोकरी द्यावी, मुंबई विद्यापीठास अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात, या व इतर मागण्या मान्य होईपर्यंत अंत्यविधी केला जाणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने गावात तणावाची स्थिती आहे . तसे निवेदन नातेवाईकांनी नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांना बुधवारी रात्री दिले. आज सकाळपर्यंत यावर तोडगा निघाला नव्हता.
तत्पूर्वी, बुधवारी औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. नातेवाईकांनी भडकलगेट येथे मृतदेह आणून ठेवल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढल्यानंतर मृतदेह घेऊन नातेवाईक बीडकडे रवाना झाले. एससी आरक्षणात अ, ब, क, ड गट करून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, या मागणीसाठी साळेगाव (ता. केज, जि. बीड) येथील संजय ताकतोडे या तरुणाने ५ मार्च रोजी बिंदुसरा प्रकल्पात उडी मारून आत्महत्या केली होती. नातेवाईकांच्या मागणीनुसार बीड पोलिसांनी संजयचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी बुधवारी औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात आणले होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास शवविच्छेदन केल्यानंतर डॉक्टरांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यावेळी तेथे त्यांचे नातेवाईक आणि मातंग समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन मृतदेह विभागीय आयुक्तालयात न्यावा आणि आपली मागणी लावून धरू असे मत मांडले. विभागीय आयुक्तालयाकडे जात असतानाच भडकलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मृतदेह उतरवून आंदोलन सुरू करण्यात आले. माहिती मिळताच उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त गोवर्धन कोळेकर, पोलीस निरीक्षक उत्तम मुळक, राजश्री आडे आदींनी धाव घेतली. खाटमोडे यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
केज तालुक्यात अज्ञाताची बसवर दगडफेक
दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबाद येथे नेला असतानाच इकडे त्याच्या मूळगावी साळेगाव येथे याचे तीव्र पडसाद उमटले. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघांनी बसवर दगडफेक करून नुकसान केले. ही घटना बुधवारी दुपारी घडली. साळेगाव येथून बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास केजहून कळंबकडे जात असलेल्या बस(एमएच २० डी ९५२१)वर कळंबकडून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात युवकांनी दगडफेक केली. यामध्ये बसच्या समोरील काचा फुटल्याने मोठे नुकसान झाले.
बुधवार रात्रीपासून साळेगावात ठिय्या आंदोलन
संजय ताकतोडेंच्या कुटूंबास पंचवीस लाख रुपये देऊन पुनर्वसन करण्यात यावे, कुटुंबातील एकास शासकीय नौकरीस घ्यावे, मुंबई विद्यापीठास अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे यासह अन्य मागण्या करत नातेवाईक आणि लहूजी सेनेतर्फे साळेगावात बुधवारी रात्रीपासून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. या मागण्यांचा ठोस निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत संजयवर अंत्यविधी केला जाणार नाही अशी भूमिका कुटुंबातील सदस्यांनी व लहुजी सेनेने घेतल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खंदारे यांनी दिली आहे. दरम्यान, याठिकाणी अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. सरकारतर्फे मंत्र्यांनी येथे भेट देऊन मागण्या मान्य करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.