होळीच्या पवित्र अग्नीत कोरोना व्हायरसचे दहन होवो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:20 AM2021-03-29T04:20:14+5:302021-03-29T04:20:14+5:30
आष्टी : जगभरासह राज्यामध्ये कोरोना या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. मागील वर्षापासून सर्वच सणांवर सावट पडले ...
आष्टी : जगभरासह राज्यामध्ये कोरोना या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. मागील वर्षापासून सर्वच सणांवर सावट पडले असून, यंदाच्या होळी उत्सवावरही पडले आहे. रविवारी आष्टी तालुक्यात होळीच्या पवित्र अग्नीमध्ये कोरोना व्हायरसचे दहन होवो या अपेक्षेने होळी पेटली. यंदा तरी कोरोना व्हायरस नष्ट होईल, अशी अपेक्षा जनतेमध्ये आहे.
आष्टी तालुक्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून या व्हायरसचा मागील वर्षापासून सर्वच सणांवर परिणाम झाला आहे. यंदाच्या होळी सणावरदेखील परिणाम झाला असून, तालुक्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात १० दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर केला आहे. या सणाचे पावित्र्य जपण्यासाठी तालुक्यातील घरोघरी होळी पेटवली जाते. यंदा कोरोना विषाणू महामारीचा संसर्ग वाढल्याने ‘होळीच्या पवित्र अग्नीमध्ये कोरोना व्हायरसचे दहन होवो, होळीच्या अग्नीत कोरोना नष्ट होवो,’ या अपेक्षेने नागरिक सोशल मीडियाद्वारे एकमेकांना शुभेच्छा देत आहेत.
कोरोना संक्रमणात सोशल मीडियावर होळीच्या शुभेच्छा
होळीच्या निमित्ताने एकमेकांना फेसबुक, व्हॉट्सॲप, ग्रीटिंग्स, इंस्टाग्रामवर इमेजेसच्या माध्यमातून असे संदेश पाठवून शुभेच्छा देण्यात आल्या. ‘पुरणाची पोळी लसीकरणाच्या माध्यमातून कोरोनाला दूर पळी’, ‘करूया कोरोना व्हायरसचे दहन’, ‘निर्धार करूया स्वच्छ व सुंदर राहण्याचा’ अशा शुभेच्छा एकमेकांना दिल्या.