धर्म की जय हो, अधर्म का नाश हो !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 12:28 AM2019-02-03T00:28:14+5:302019-02-03T00:28:39+5:30
धर्म की जय हो, अधर्म का नाश हो’ अशा जयघोषात शनिवारी गोरज मुहुर्तावर दाक्षिणाम्नाय शारदपीठ (कर्नाटक) जगद्गुरु शंकराचार्य श्रीविधुशेखर भारती यांची शोभायात्रा शहरातून काढण्यात आली. घोडेस्वार, महिलांचे ढोल पथक, आदर्श विद्यालयाचे लेझीम पथक, दशावतार, फेटेधारी महिलांचा सहभाग आणि वाद्यवृंदाच्या सुरात वातावरण चैतन्यमय बनले होते.
बीड : ‘धर्म की जय हो, अधर्म का नाश हो’ अशा जयघोषात शनिवारी गोरज मुहुर्तावर दाक्षिणाम्नाय शारदपीठ (कर्नाटक) जगद्गुरु शंकराचार्य श्रीविधुशेखर भारती यांची शोभायात्रा शहरातून काढण्यात आली. घोडेस्वार, महिलांचे ढोल पथक, आदर्श विद्यालयाचे लेझीम पथक, दशावतार, फेटेधारी महिलांचा सहभाग आणि वाद्यवृंदाच्या सुरात वातावरण चैतन्यमय बनले होते.
भारत विजय यात्रेनिमित्त जगद्गुरु शंकराचार्य श्रीविधुशेखर भारतींचे सायंकाळी आगमन झाल्यानंतर बलभीम चौकातून शोभायात्रेला प्रारंभ झाला. तत्पूर्वी संयोजन समितीचे अॅड. कालीदास थिगळे, वे.शा.सं. धुंडीराजशास्त्री पाटांगणकर, हभप भरतबुवा रामदासी, नामदेवराव क्षीरसागर, वे.शा.सं. अमोलशास्त्री जोशी, डॉ. दिलीप देशमुख, दिलीप खिस्ती, दुर्गादासगुरु जोशी, एकनाथ महाराज पुजारी आदींच्या हस्ते स्वामीजींचे स्वागत करण्यात आले. भव्य दिव्य सजवलेल्या रथात स्वामीजी विराजमान होताच धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, भारतमाता की जय असा जयघोष करण्यात आला.
दिमाखदार फेटा, लेझीम पथक
या शोभायात्रेत ब्रम्हतेज, आदिशक्ती, जिओ गीता, राधे राधे, विठोबा रुखमाई आदी महिला मंडळाच्या महिला डोक्यावर मंगल कलश, फेटे बांधून उत्स्फूर्तपणे सहभागी होत्या. शोभायात्रेत सहभागी पुरोहित पारंपरिक वेशभूषा परिधान करुन मंत्र जयघोष करत होते.
आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दीप्ती औटी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने जयोस्तुते व इतर देशभक्तीपर गीतांवर प्रात्यक्षिके सादर केली. रोहिणी बाभुळगावकर यांनी दशावतार तर अनुराधा खरवडकर यांच्या प्रयत्नांतून विविध संत महंत, राष्टÑभक्तांची वेशभूषा साकारलेले विद्यार्थी शोभायात्रेत सहभागी होते. बलभीम चौक, धोंडीपुरा, माळीवेस, सुभाष रोड, सिद्धीविनायक संकुल मार्गे सहयोगनगर येथील सर्वेश्वर गणपती मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. तेथे मंदिर विश्वस्तांच्या वतीने स्वामीजींचे स्वागत व त्यानंतर त्यांच्या हस्ते श्री गजाननाचे पूजन करण्यात आले. शोभायात्रेच्या सांगतेनंतर औटी मंगल कार्यालयात श्री चंद्रमौलीश्वर परमेश्वर पुजा करण्यात आली.