अनधिकृत गुंठेवारीचा नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:12 AM2021-08-02T04:12:44+5:302021-08-02T04:12:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : शहरातील सर्व्हे नंबर ८ व ३७२ या अनधिकृत जमिनीत गुंठेवारी करण्याचा घाट येथील नगरपालिकेचे ...

Mayor of Unauthorized Gunthewari, Chief's Ghat | अनधिकृत गुंठेवारीचा नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांचा घाट

अनधिकृत गुंठेवारीचा नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांचा घाट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

माजलगाव : शहरातील सर्व्हे नंबर ८ व ३७२ या अनधिकृत जमिनीत गुंठेवारी करण्याचा घाट येथील नगरपालिकेचे नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी घातला आहे. यात आपणासच मोठा मलिदा मिळावा यासाठी सध्या या दोघांत वाद सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

नगराध्यक्ष शेख मंजूर यांचा मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न असफल ठरला. असे असले तरी या दोघांत सध्या व यापुढेही धुसफूस सुरूच राहील, असेच चित्र दिसत आहे. यामुळे पुढील काळात शहराच्या विकासाला खीळ बसण्याची चिन्हे दिसत आहेत.

शहरालगत असलेल्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या सर्व्हे नंबर ३७२ ही फल्डझोनमध्ये येणारी व सर्व्हे नंबर ८ मधील नगरपालिकेच्या मालकीच्या जमिनीची अनधिकृत गुंठेवारी करण्याचा घाट नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी घातला असल्याचे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. यासाठी नगरपालिकेचे नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी कागदपत्रांवर सह्यांचा अधिकार नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक गणेश डोंगरे यांना दिला होता; परंतु डोंगरे हे दबावापोटी कोठेही सह्या करीत असल्याने मुख्याधिकाऱ्यांनी डोंगरे यांचा सह्यांचा अधिकार काढून स्वतःकडे ठेवला. यानंतर पुन्हा डोंगरे यांनाच सह्यांचा अधिकार द्यावा म्हणून मुख्याधिकाऱ्यांवर दबाव वाढविला आहे. सह्यांचा अधिकार डोंगरे यांच्याकडे राहिल्यास आपणास काहीच मलिदा मिळणार नाही, यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी डोंगरे यांना दिलेला सह्यांचा अधिकार काढत स्वतःकडे घेतला. यातून नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांत वाद घडल्याचे नगरसेवक सांगत आहेत. दरम्यान, नगरपालिकेच्या विशेष सभेत आ. प्रकाश सोळंके यांच्या दबावापुढे नगराध्यक्ष व नगरसेवकांनी बैठकीतील मुद्दे मंजूर करून घेतले, असेही नगरसेवक सांगत आहेत.

--------

नगरपालिकेच्या जागेची लावली वाट

माजलगाव शहरातील सर्व्हे नंबर ८ मध्ये १९८६ मध्ये नगरपालिकेने पालिकेच्या सफाई कामगारांसाठी जागा विकत घेतली होती. यातील १७४ प्लॉटपैकी केवळ बोटावर मोजण्याइतकेच प्लॉट सफाई कामगारांना देण्यात आले होते; परंतु त्यांना अद्याप ताबा दिला नाही. यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. तरी काही पदाधिकाऱ्यांनी ही जागा इतर लोकांच्या नावावर करण्याचा प्रयत्न चालविला आहे. याविरोधात मी आयुक्त कार्यालयासमोर १३ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करणार आहे.

-अनिल साळवे, रिपब्लिकन सेना, तालुकाध्यक्ष

--------

नगरपालिकेत विविध कामांच्या मोठ्या प्रमाणात फाईल, प्रस्ताव आले आहेत. मुख्याधिकाऱ्यांना या फाईल तपासण्यासाठी वेळ लागल्याने नागरिकांची वेळेवर कामे होत नाहीत. यामुळे ज्या फाईलमध्ये काही त्रुटी नाहीत अशा फाईलवर कार्यालयीन अधीक्षकांना सह्यांचे अधिकार देण्यास सांगितले होते.

-शेख मंजूर, नगराध्यक्ष

---------

सर्व्हे नंबर ८ मधील जागेबाबत कार्यालयीन अधीक्षक काही कामे चुकीची करीत असल्याचे लक्षात आल्याने मी त्यांचा सह्यांचा अधिकार काढला. सध्या सह्यांचे अधिकार माझ्याकडे आहेत.

-विशाल भोसले, मुख्याधिकारी

Web Title: Mayor of Unauthorized Gunthewari, Chief's Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.