नरेंद्र मोदींच्या सभेतील भोजनाचे बिल पोलिसांनी थकवले; मेसचालकाचा आत्महत्येचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 04:37 PM2020-08-28T16:37:54+5:302020-08-28T16:44:13+5:30
मोदींच्या सभेसाठी बंदोबस्तावरील पोलिसांच्या जेवणाची केली होती व्यवस्था
परळी (जि. बीड) : विधानसभा निवडणुकीनिमित्त परळीत बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाच दिवसांच्या जेवणाचे बिल दहा महिन्यांपासून थकीत असल्याने मेसचालकावर उपासमारीची वेळ आली आहे. हे बिल तात्काळ मिळावे, अशी मागणी मेसचे चालक संजय रामलिंग स्वामी यांनी बीडच्या जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. तात्काळ बिल न मिळाल्यास आत्महत्येचा इशारादेखील निवेदनाद्वारे दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परळीत सभा झाली. त्यासाठी परळी शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या बंदोबस्तासाठी जिल्हा व बाहेरून आलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या ५ दिवसांच्या जेवणाची सोय येथील विद्यानगरमधील मेसने केली होती. अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपाधीक्षक राहुल धस व पोनि. कदम यांनी हे कंत्राट दिले होते. त्यांच्या सांगण्यावरून मेसचालक संजय रामलिंग स्वामी यांनी १५ ते २० ऑक्टोबरदरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जेवणाची सुविधा उपलब्ध केली.
बिल २ लाख ६२ हजार रुपये जिल्हा पोलीस अधीक्षक बीड यांच्या कार्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, १० महिने होऊनदेखील बिल मिळाले नाही. त्यासंदर्भात मेसचालक स्वामी म्हणाले, जेवणासाठी त्यावेळी उधारीवर किराणा सामान घेऊन सर्व व्यवस्था केली होती. मार्चपासून लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे माझी मेस बंद आहे. त्यामुळे व्यवसाय बंद आणि बिल थकले हे दुहेरी संकट आले आहे.
सलग दुसऱ्या दिवशीही प्रेतयात्रा तहसील कार्यालयातhttps://t.co/6WbM7glspd
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) August 28, 2020