शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये जेवण, नाष्टा दोन तास उशिरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:34 AM2021-04-22T04:34:39+5:302021-04-22T04:34:39+5:30
पुरुषोत्तम करवा माजलगाव : येथे चालू असलेल्या शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण आहेत. जेवण व ...
पुरुषोत्तम करवा
माजलगाव : येथे चालू असलेल्या शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण आहेत. जेवण व नाष्टा पुरविणाऱ्या ठेकेदाराची यंत्रणा अपुरी असल्याने रुग्णांना नियोजित वेळेपेक्षा दोन-दोन तास ताटकळत बसण्याची वेळ येत आहे. येथे दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा चांगला नसल्याचा अहवाल प्रशासनाने दिलेला असतानाही ठेकेदार बदलण्यास संबंधित अधिकारी आणि विभाग तयार होत नसल्याने रुग्णांना घरचे जेवण मागविण्याची वेळ आली आहे. रुग्णांना देण्यात येत असलेल्या जेवणाची थाळी ही अत्यल्प असल्याने कमी प्रमाणातील जेवणामुळे रुग्णांना उपाशी राहण्याची वेळ आली आहे. दोन आठवड्यांपूर्वी येथील तहसीलदार व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे. जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याचा वरदहस्त असल्याने ठेकेदार कोणालाही घाबरताना दिसत नसल्याचे सांगितले जाते. येथील शासकीय कोविड सेंटरमध्ये १०० पेक्षा कमी रुग्ण असतानाही संबंधित ठेकेदार हा जेवणाचा दर्जा सुधारण्यास तयार नव्हता. सध्या तर सेंटरमध्ये जवळपास ३५० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
सध्या भोजनाचा ठेका चालवत असलेल्या ठेकेदाराची आम्ही तक्रार केलेली आहे; पण वरिष्ठांकडून याबाबत अद्याप निर्णय दिला नसल्याने आम्ही वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन चार ठिकाणांपैकी दोन ठिकाणच्या जेवणाची व्यवस्था दुसऱ्या व्यक्तीस करण्यास सांगितली आहे.
- डॉ. मधुकर घुबडे, तालुका वैद्यकीय अधिकारी