बीडमध्ये यंत्रणा कामाला; मृत्यू शोधण्यासाठी समिती नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:33 AM2021-05-10T04:33:55+5:302021-05-10T04:33:55+5:30
बीड : जिल्ह्यात स्मशानातील अंत्यसंस्कार व आरोग्य विभागाकडील कोरोनाबळींच्या आकड्यात १०५ची तफावत आली होती. आरोग्य विभाग मृत्यूचे आकडे लपवीत ...
बीड : जिल्ह्यात स्मशानातील अंत्यसंस्कार व आरोग्य विभागाकडील कोरोनाबळींच्या आकड्यात १०५ची तफावत आली होती. आरोग्य विभाग मृत्यूचे आकडे लपवीत असल्याची बाब ‘लोकमत’ने उघड केली होती. यावर रविवारी प्रशासन चांगलेच कामाला लागले. अंबाजोगाईचे अधिष्ठाता, जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक आणि सर्व नगर परिषदांना पत्र पाठवून मृत्यूची माहिती मागविली आहे. यासाठी पाच सदस्यांची समितीही चौकशीसाठी नियुक्त केली आहे.
जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. त्यातच उपचार व सुविधांबद्दल रोज तक्रारी प्राप्त होत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येसह मृत्यूही होत आहेत. हाच धागा पकडून 'लोकमत'ने स्मशानात अंत्यसंस्कार झालेल्या बाधितांची संख्या आणि आरोग्य विभागाकडे नोंद असलेल्या मृत्यूचा आकडा घेतला. यात एप्रिल महिन्यात तब्बल १०५ मृत्यूंची तफावत आढळली. यावर रविवारी 'लोकमत'ने ‘धक्कादायक; बीडमध्ये आरोग्य विभागाने लपविले १०५ कोरोनाबळी' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर प्रशासनाची चांगलीच झोप उडाली. रविवारी सकाळपासून यंत्रणा कामाला लागली. जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, स्वाराती रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, तालुका आरोग्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांना पत्र पाठवून आतापर्यंतच्या सर्व मृत्यूची माहिती मागविली आहे. तसेच चौकशीसाठी पाच सदस्यांची समिती नियुक्त केली असून तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत. या प्रकाराने आता चांगलीच खळबळ उडाली असून, यात काय समोर येते, हे तीन दिवसांनंतर उघड होणार आहे.
आमदार मुंदडांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी या प्रकाराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले. या गंभीर प्रकाराची तत्काळ चौकशी करून योग्य तो आकडा सांगावा, अशी मागणी केली आहे.
.....
चौकशीसाठी पाच सदस्यांची समिती तयार केली आहे. तीन दिवसांची मुदत दिली आहे. तसेच सर्व नगरपरिषद, स्वाराती व जिल्हा रुग्णालय, तालुका आरोग्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांना पत्र पाठवून माहिती मागविली आहे.
- डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्याधिकारी, बीड.
===Photopath===
090521\09_2_bed_6_09052021_14.jpg
===Caption===
९ मे रोजी लोकमतने प्रकाशित केलेले वृत्त. याच अनुषंगाने आता यंत्रणा कामाला लागली असून चौकशीसाठी समिती नियूक्त केली आहे.