अधीक्षकांसह वैद्यकीय अधिकारी गायब, रुग्णसेवेतही त्रुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:38 AM2021-08-21T04:38:35+5:302021-08-21T04:38:35+5:30
बीड: खुद्द वैद्यकीय अधीक्षकांसह डॉक्टर, आरोग्य कर्मचारी गायब झालेले... ताटकळत बसलेले रुग्ण, लसीकरणासह कोविड चाचण्यांचे काम बंद... हे ...
बीड: खुद्द वैद्यकीय अधीक्षकांसह डॉक्टर, आरोग्य कर्मचारी गायब झालेले... ताटकळत बसलेले रुग्ण, लसीकरणासह कोविड चाचण्यांचे काम बंद... हे चित्र होते माजलगाव तालुक्यातील तालखेड येथील ग्रामीण रुग्णालयाचे. प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी १९ ऑगस्ट रोजी ग्रामीण रुग्णालयात सरप्राइज व्हिजिट दिली. हा अनागोंदी कारभार पाहून डॉ. साबळे चक्रावून गेले. त्यांनी दांडीबहाद्दरांचे एक दिवसाचे वेतन कपात करून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
तालखेड येथील ग्रामीण रुग्णालयासंदर्भात तक्रारी होत्या. त्यानुषंगाने १९ ऑगस्ट रोजी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साबळे यांनी अचानक भेट दिली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिजित पंडित यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी हे गैरहजर आढळून आले. रुग्णसेवेतही मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्या. रुग्णालयात कुठल्याही प्रकारचे लसीकरण सुरू नव्हते. प्रसूतीसाठी आलेल्या रुग्णांना रेफर केले जात होते. आरटीपीसीआर व अँटिजन चाचण्या पुरेशा प्रमाणात केल्या जात नव्हत्या. आरकेएस, एनएचएमअंतर्गत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात नाहीत, असे दिसून आले. रुग्णालयातील नोंदी अद्ययावत नव्हत्या. बाह्यरुग्ण शुल्क व आंतररुग्ण शुल्कासंदर्भात दिलेल्या सूचनांचे पालन केले जात नव्हते, असे निष्पन्न झाले. हा सर्व प्रकार पाहून डॉ. साबळे यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक भेटीला आल्याचे कळाल्यावर अधीक्षक डॉ. पंडित यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकारी धावतच रुग्णालयात आले. मात्र, डॉ. साबळे यांनी कामचुकारांची गय केली नाही. गैरहजर सर्वांच्या नोंदी घेऊन एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश दिले. शिवाय कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे दांडीबहाद्दरांची पाचावर धारण बसली आहे.
....
तालखेड ग्रामीण रुग्णालयास सरप्राईज व्हिजिट दिली तेव्हा वैद्यकीय अधीक्षकांसह इतर अधिकारी व कर्मचारी गायब असल्याचे आढळून आले. रुग्णसेवेतील त्रुटी देखील गंभीर स्वरूपाच्या आहेत. रुग्णसेवेत सुधारणा होण्याच्या दृष्टीने वेतन कपात करून नोटीस बजावली आहे. यातून इतरांनी धडा घ्यावा, अन्यथा कारवाई अटळ आहे.
- डॉ. सुरेश साबळे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक
....
200821\20bed_14_20082021_14.jpg
जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट