‘व्हिजिट’च्या नावावर वैद्यकीय अधिकाऱ्यांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:54 PM2019-09-10T23:54:51+5:302019-09-10T23:55:31+5:30

एका वैद्यकीय अधिका-याने रूग्णांची तपासणी करावी तर दुस-याने उपकेंद्र व अंगणवाडी आणि इतर ठिकाणी भेटी देणे आवश्यक आहे.

Medical officers are punished in the name of 'visits' | ‘व्हिजिट’च्या नावावर वैद्यकीय अधिकाऱ्यांची दांडी

‘व्हिजिट’च्या नावावर वैद्यकीय अधिकाऱ्यांची दांडी

Next
ठळक मुद्देटीएचओंचे दुर्लक्ष : प्राथमिक आरोग्य केंद्रातील ‘अ‍ॅडजस्टमेंट’ थांबेना; डॉक्टरांची पदे भरल्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’

बीड : एका वैद्यकीय अधिका-याने रूग्णांची तपासणी करावी तर दुस-याने उपकेंद्र व अंगणवाडी आणि इतर ठिकाणी भेटी देणे आवश्यक आहे. मात्र, सद्यस्थितीत भेटीच्या नावाखाली वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्राला दांडी मारत असल्याचे समोर आले आहे. हा सर्व प्रकार तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती असतानाही त्यांच्याकडून अशा कामचुकारांना पाठिशी घातले जात असल्याचे बोलले जात आहे. डॉक्टरांच्या ‘अ‍ॅडजस्टमेंट’चा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे.
बीड जिल्ह्यात ५१ ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. प्रत्येक केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी नियमितपणे नियुक्त करण्यात आलेले आहेत. अगोदर मोठ्या प्रमाणात वैद्यकीय अधिका-यांचा जागा रिक्त होत्या. ‘लोकमत’ने रिक्त पदांचा प्रश्न लावून धरल्यावर राज्यात ८७७ एमओंच्या जागा भरल्या. बीड जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात नवीन डॉक्टर आले. त्यामुळे आता कारभार सुधारेल, अशी अपेक्षा होती. मात्र, परिस्थिती जैसे थे असल्याचे पहावयास मिळत आहे.
नियमानुसार दोन्ही वैद्यकीय अधिका-यांनी नियमित कर्तव्यावर जाणे बंधनकारक आहे. मात्र, काही कामचुकार वैद्यकीय अधिकारी तालुका आरोग्य अधिका-यांना हाताशी धरून सर्रास गैरहजर राहत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे दोन्ही अधिका-यांनी ‘अ‍ॅडजस्टमेंट’ करीत एक दिवसाआड ड्यूट्या ठरवून घेतल्या आहेत. जो अधिकारी रूग्णांची तपासणी करेल तोच फक्त उपस्थित असतो. जो भेटी देण्यासाठी बाहेर पडतो, तो जातच नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. याचा फटका कामावर होत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे
सीईओंच्या आदेशाकडे टीएचओंचे दुर्लक्ष
मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दोन्ही वैद्यकीय अधिकारी केंद्रात उपस्थित राहणे बंधनकारक केले होते. त्यांची नियमित हजेरी घेण्याच्या सुचना सर्व तालुका आरोग्य अधिकाºयांना दिल्या होत्या. मात्र, काही अधिकारी केंद्रात जातच नाहीत. तरीही तालुका आरोग्य अधिकाºयांकडून त्यांची हजेरी ‘उपस्थित’ म्हणून टाकली जात आहे. सीईओंच्या आदेशाला टीचओंकडून केराची टोपली दाखविली जात असल्याचे यावरून दिसून येत आहे.
विश्वास नसल्याने रूग्ण उदासिन
प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर उपस्थित नसतात, व्यवस्थित उपचार करीत नाहीत, असा समज सर्वसामान्यांमध्ये आहे. त्यांचा विश्वास जिंकुन पीएचसीमध्येच दर्जेदार आणि तत्पर उपचार मिळतात, हे सांगण्यात अपयश आलेले आहे. त्यामुळे सरकारी रूग्णालयात जावून उपचार घेण्यास नागरिक उदासीन असतात. याचा फायदा या कामचुकार डॉक्टरांना होत आहे.
काय करतात तालुका आरोग्य अधिकारी ?
पाटोदा, धारूर आणि गेवराईच्या तालुका आरोग्य अधिकाºयांकडे बीडच्या पदांचा अतिरिक्त पदभार आहे. इतर ठिकाणचे टीएचओ नियमित आहेत. दोनपैकी एक अधिकारी गैरहजर असतो. दोघांमध्ये ‘अ‍ॅडजस्टमेंट’ करून कर्तव्य बजावले जात असल्याचे त्यांना माहिती असते. अचानक भेट देऊन तपासणी करण्यास टीचओ हलगर्जी करतात. याचा फायदा कामचुकारांना होतो तर सर्वसामान्यांना त्रास होत आहे. टीएचओंचे दुर्लक्षही रूग्णांचे हाल होण्यास कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे.

Web Title: Medical officers are punished in the name of 'visits'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.