जयदत्तअण्णांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडेंची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 11:35 PM2019-10-08T23:35:22+5:302019-10-08T23:35:59+5:30
बीड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे ह्या रिंगणात उतरल्यामुळे क्षीरसागरांचे पारडे अधिक जड झाले आहे.
बीड : बीड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे ह्या रिंगणात उतरल्यामुळे क्षीरसागरांचे पारडे अधिक जड झाले आहे.
१० आॅक्टोबर रोजी रायमोहा येथे सकाळी १० वाजता पंकजा मुंडे यांची जाहीर सभा होत आहे. क्षीरसागरांच्या प्रचारार्थ पंकजा यांची ही पहिली सभा असून, त्यानंतर त्यांच्या मतदारसंघात अनेक ठिकाणी सभा ठेवण्यात आलेल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप उमेदवार प्रीतम मुंडे यांच्यासाठी जयदत्त क्षीरसागर यांनी सलग २१ दिवस जिल्हाभरात बैठका, सभा आणि गावोगावी प्रचारात उतरुन त्यांच्या विजयासाठी रणशिंग फुंकले होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाच त्यांनी आपल्या समर्थकांचा जाहीर मेळावा पाडव्याच्या पूर्वसंध्येला घेत भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांनी विजयी करण्याचे आवाहन केले होते.
पक्षात नसतानाही त्यांनी भाजपच्या मुंडे यांना जाहीर पाठिंबा दिल्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यांनी केवळ घोषणाच केली नाही तर मुंडे यांच्या विजयासाठी २१ दिवस बीड विधानसभा मतदार संघ प्रचार करुन पालथा घातला होता. विशेष म्हणजे त्यांच्या या प्रयत्नामुळे मुंडे यांना बीड विधानसभा मतदारसंघातून मताधिक्यही मिळाले. त्यानंतर मतमोजणीच्या आदल्या दिवशी शिवसेनेत प्रवेश करुन भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला. युतीचा हा धर्म आता पंकजा मुंडे ह्या पाळत असून, जयदत्त क्षीरसागरांच्या प्रचारार्थ त्या रायमोहा येथे सभा घेत आहेत.
रायमोहा येथील सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सुधाकर मिसाळ, वैजनाथ मिसाळ, वैजनाथ तांदळे, रामराव खेडकर यांनी केले आहे.
....तर विरोधकांची भंबेरी उडाल्याशिवाय राहणार नाही
विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा सुरु झाला असून, यात महायुतीतील एकवाक्यता दिसून येत आहे. भाजप आणि शिवसेना युतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कामाला लागले आहेत. पंकजा मुंडे यांच्या या सभेमुळे शिवसेनेमध्ये देखील उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, कार्यकर्ते जोमाने प्रचाराला लागले आहेत.भाजप आणि शिवसेनेची जिल्ह्यात ताकद असून, दोघे एकदिलाने प्रचारात उतरले तर विरोधकांची भंबेरी उडाल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया जिल्ह्यातून ऐकावयास मिळत आहे.