प्रेमानं करतो चोरी... दवाखान्याजवळ भेटतो, चहा पाजतो अन् गोडी‘गुलाबी’ने लुटतो
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 12:34 PM2022-02-19T12:34:17+5:302022-02-19T12:34:59+5:30
बीड : चोर, दरोडेखोर म्हटले की पैसे, दागिने घेऊन पळणारा, कधी मारहाण, तर कधी थेट शस्त्राने हल्ला करणारा, अशीच ...
बीड : चोर, दरोडेखोर म्हटले की पैसे, दागिने घेऊन पळणारा, कधी मारहाण, तर कधी थेट शस्त्राने हल्ला करणारा, अशीच सगळ्यांच्या मनात प्रतिमा असते. मात्र, शहरात असाही एक चोरटा आहे जो तुम्हाला खासगी दवाखान्यांजवळ भेटतो, ओळखीचा बहाणा करत जवळीक निर्माण करतो, चहा पाजतो अन् गोडी‘गुलाबी’ने नंतर तुमचा खिसा खाली करून आरामात निघून जातो. चोरट्याने लुटीसाठी लढवलेली नामी शक्कल ऐकून पोलीसदेखील चक्रावून गेले.
गुलाब दिगंबर बनसोडे (वय ४०, रा. राडी तांडा, ता. अंबाजोगाई, हमु. जुनी भाजी मंडई, बीड), असे त्या आराेपीचे नाव आहे. १५ फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळील एका खासगी एमआरआय सेंटरवर हातचलाखीने एकाचे १५ हजार रुपये काढून घेत पोबारा केला. दरम्यान, फसवणूक झालेल्या व्यक्तीने आरडाओरड केल्यावर शिवाजीनगर ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, पो.ना. मोहसीन शेख यांनी मोठ्या शिताफीने त्यास पकडले. त्याने सुरुवातीला आढेवेढे घेतले; पण पोलिसांनी आपल्या स्टाइलमध्ये चौकशी केल्यावर त्याने पत्नीकडे ठेवलेले १५ हजार रुपये लगेचच काढून दिले. दरम्यान, संबंधित व्यक्तीने तक्रार दिली नाही. मात्र, २८ डिसेंबर २०२१ रोजी शिवाजी नगर ठाण्यात निवृत्त कर्मचारी कोंडिबा दगडू धुताडमल (रा. पालवण चौक, बीड) यांनी अज्ञाताविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली होती. धुताडमल हे बँकेतून पैसे काढून घराकडे जात होते, यावेळी बसस्थानकासमोर त्यांना अडवून ४० हजार रुपये लांबविले होते. धुताडमल यांना लुटणारा दुसरा तिसरा कोणी नसून, गुलाब बनसोडेच असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. पो.नि. केतन राठोड, सपोनि अमोल गुरले, हवालदार एन.ए. काळे यांनी त्याची कसून चौकशी केली. त्याने अनेकांना गंडा घातल्याचा संशय असून, त्यादृष्टीने तपास सुरू आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून लपवायचा तोंड
गुलाब बनसोडे हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत दिसू नये, याची काळजी घ्यायचा. दवाखान्यापासून काही अंतरावर थांबायचा. एकट्या दुकट्या ज्येष्ठ नागरिकाला गोड बोलून, चहा पाजून भुरळ घालायचा. आई दवाखान्यात आहे, पैसे नाहीत, असा बहाणा करून चलाखीने पैसे उकळायचा, अशी माहिती तपासात समोर आली असल्याचे पो.नि. केतन राठोड यांनी सांगितलेे. अशा प्रकारे फसवणूक झालेल्यांनी तक्रार देण्यासाठी समोर यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.