शेख यांचा अब्रनुकसानीचा दावा, चित्रा वाघ यांचे बीड न्यायालयात शपथपत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 04:12 PM2021-12-21T16:12:39+5:302021-12-21T16:15:52+5:30
शिरुर कासार येथील तरुण सराफा व्यापारी विशाल कुल्थे यांची मे २०२१ मध्ये हत्या झाली होती. त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ १८ जुलै २०२१ रोजी शिरुर कासार येथे आल्या होत्या.
बीड : बलात्कारी म्हणून उल्लेख करून बदनामी केल्याच्या कथित वक्तव्यावर आक्षेप घेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी भाजपच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्याविरुद्ध बीडच्यान्यायालयात ५० लाख रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केलेला आहे. २१ डिसेंबर रोजी त्यावर सुनावणी होणार असून, २० डिसेंबर रोजी चित्रा वाघ यांनी येथील न्यायालयात येऊन शपथपत्र दाखल केले.
शिरुर कासार येथील तरुण सराफा व्यापारी विशाल कुल्थे यांची मे २०२१ मध्ये हत्या झाली होती. त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ १८ जुलै २०२१ रोजी शिरुर कासार येथे आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचे शिरुर कासार हे होमपीच आहे. तेथे त्यांनी मेहबूब शेख यांच्यावरही प्रहार केला होता. बलात्कारी असा उल्लेख करून टीका केल्याचा आरोप करत मेहबूब शेख यांनी चारित्र्यहनन केले म्हणून शिरुर ठाण्यात चित्रा वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला होता. दरम्यान, कथित वक्तव्याआधारे मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्याविरुद्ध बीड न्यायालयात ५० लाख रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता. यासंदर्भात यापूर्वी झालेल्या न्यायालयीन प्रक्रियेला चित्रा वाघ बीड न्यायालयात आल्या होत्या. आता २१ डिसेंबर रोजी या प्रकरणात सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर २० डिसेंबर रोजीच चित्रा वाघ यांनी न्यायालयात येऊन शपथपत्र दाखल केले. चित्रा वाघ यांच्या वतीने ज्येष्ठ वकील बाळासाहेब कोल्हे हे आज, दि. २१ रोजी बाजू मांडणार आहेत.
काय म्हटलंय शपथपत्रात
या प्रकरणाची सुनावणी सह दिवाणी न्या. (वरिष्ठ स्तर ) एम. व्ही. फडे यांच्यासमोर सुरू आहे. मेहबूब शेख यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या अत्याचाराच्या गुन्ह्याचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचे कारण नाही, असे शपथपत्रात नमूद आहे. शपथपत्रासंदर्भात सर्व त्या कायदेशीर बाबी चित्रा वाघ यांनी न्यायालयात येऊन पूर्ण केल्या. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह मोजके पदाधिकारी त्यांच्यासमवेत होते. तथापि, आज, २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष आहे.