पारा चाळिशीकडे; पीपीई कीटमुळे तंत्रज्ञाला भोवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:54 AM2021-05-05T04:54:24+5:302021-05-05T04:54:24+5:30
बीड : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई, तसेच त्यांची अँटिजेन टेस्ट करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर सोमवारपासून बीडसह जिल्ह्यात ...
बीड : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई, तसेच त्यांची अँटिजेन टेस्ट करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर सोमवारपासून बीडसह जिल्ह्यात सर्वत्र मोहीम सुरू करण्यात आली. या दरम्यान बीडमध्ये एका प्रयोगशाळा तंत्रज्ञ पीपीई कीटमुळे ओलाचिंब झाला. काही वेळेत अस्वस्थता जाणवू लागली, भोवळ आल्यासारखे डोळे फिरत होते. अखेर सहकाऱ्यांनी मदत करीत हवेसाठी वाट मोकळी केली. थोडा वेळ बसून नंतर पुन्हा तपासणी सुरू करीत कोरोनाशी लढताना या कर्मचाऱ्याने कर्तव्य तत्परता दाखवून दिली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात नेमलेल्या पथकात प्रयोगशाळा तंत्रज्ञ बी. एस. जोशी, शिक्षक एन. एल. राख, डी. एन. मिसाळ, आरोग्य कर्मचारी एल. एस राऊत, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. सकाळी ११ वाजता कामाला सुरुवात झाली. काहीवेळ आधी प्रयोगशाळा तंत्रज्ञ जोशी यांनी पीपीई कीट परिधान केले होते. अर्धा तास होत नाही तोच जोशी घामाघूम झाले. पाणी मागितल्याने तहान लागली असावी, असे सहकाऱ्यांना वाटले. मात्र, जोशी अस्वस्थ दिसत होते. घामाघूम होऊन ओलेेचिंब झाले, तसेच चक्कर आल्याचे दिसताच सहकाऱ्यांनी परिस्थिती ओळखून हवा मिळावी म्हणून आवश्यक ती मदत केली. त्यामुळे तंत्रज्ञ जोशी यांना काही वेळाने बरे वाटले. थोडा वेळ निवांत बसून टीमबरोबर अँटिजेन टेस्टचे कर्तव्य सायंकाळी साडेपाचपर्यंत पार पाडले. अँटिजेन टेस्टसाठी पथके नेमली असली तरी भौतिक सुविधा या पथकांनाच उपलब्ध करून घ्याव्या लागत आहेत. सोमवारी या ठिकाणी पेट्रोलपंपामुळे सावली आणि मोकळी जागा होती. मात्र, चाळिशीकडे पारा चढलेला व तीव्र झळा असताना अशा मोहीम राबविण्यासाठी प्रहर आणि वेळेचे नियोजन करण्याची गरज आहे, त्याचबरोबर विनाकारण फिरणाऱ्यांनी भान ठेवून प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे.